एकेकाळी घरखर्चाबाबत हतबल झालेले डॉ. मनमोहन सिंग भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार कसे झाले?

मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, सौतिक बिस्वास
  • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Twitter,

मनमोहन सिंग हे स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ काम केलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक होते. 'अतिशय प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे नेते' अशी त्यांची ख्याती होती.

2004 ते 2014 या दहा वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान म्हणून आणि त्याआधी देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम महत्त्वाचं होतं.

नव्वदच्या दशकात भारताच्या आर्थिक धोरणांचा, उदारीकरण आणि एकूणच आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातं.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मनमोहन सिंग हे एकमेव पंतप्रधान होते, जे त्यांच्या पहिल्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यात यशस्वी ठरले.

देशाचं पंतप्रधानपद भूषवणारे मनमोहन सिंग हे पहिले शीख नेते होते. मनमोहन सिंग यांनी देशाच्या संसदेत 1984 च्या शीख दंगलीबाबत माफी मागितली होती. या दंगलीत सुमारे 3,000 शीख नागरिकांचा मृत्यू झाला होता.

मनमोहन सिंग यांचा दुसरा कार्यकाळ मात्र अनेक चुकीच्या कारणांनी गाजला. त्यांच्या या कार्यकाळात मनमोहन सिंग सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे झालेले आरोप 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी काही अंशी जबाबदार होते, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं.

26 सप्टेंबर1932 रोजी अविभाजित भारतात असणाऱ्या पंजाबमधल्या एका अशा गावात मनमोहन सिंग यांचा जन्म झाला जेथे ना पाणी होतं, ना वीज पोहोचली होती.

पंजाब विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आणि नंतर ऑक्सफर्डमधून डीफिल पदवी घेतली.

मनमोहन सिंग यांच्या मुलगी दमन सिंग यांनी त्यांच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, केंब्रिजमध्ये शिकत असताना पैशांच्या कमतरतेमुळे मनमोहन सिंग नेहमी चिंताग्रस्त असत.

"त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी सुमारे 600 पाऊंड खर्च यायचा. पंजाब विद्यापीठानं दिलेल्या शिष्यवृत्तीतून त्यांना 160 पाऊंड मिळायचे. उर्वरित खर्चासाठी त्यांना त्यांच्या वडिलांवर अवलंबून रहावं लागत होतं. त्यामुळे मनमोहन सिंग अत्यंत काटकसर करून तिथं राहायचे. तिथल्या डायनिंग हॉलमध्ये मिळणारं अनुदानित जेवण करून ते जगले. त्यावेळी ते जेवण 2 शिलिंग म्हणजेच सुमारे 16 रुपयांना मिळायचं."

दमन सिंग यांनी त्यांच्या वडिलांबाबत लिहिलं, "घरखर्चाबाबत ते एवढे हतबल होते की त्यांना साधं अंडं उकडून खाता यायचं नाही किंवा कधी टेलिव्हिजनही पाहता यायचा नाही."

एकमत घडवून आणण्यात होता हातखंडा

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातील घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

1991 साली मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थमंत्रिपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती.

प्रदीर्घ शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीनंतर अनेपक्षितपणे मनमोहन सिंग यांची देशाचे अर्थमंत्री म्हणून निवड झाली होती. त्याआधी त्यांनी भारत सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं होतं. तसेच ते भारताच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर देखील राहिले होते.

अर्थमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात ते व्हिक्टर ह्युगोला उद्धृत करत म्हणाले होते, "ज्या कल्पनेची वेळ आली आहे ती कल्पना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही." त्यांचे हे उद्‍गार प्रसिद्ध झाले होते.

यातूनच भारताच्या महत्त्वाकांक्षी आणि अभूतपूर्व आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली होती. मनमोहन सिंग यांनी कर कमी केले, रुपयाची किंमत कमी केली, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या किंवा उपक्रमांचं खासगीकरण केलं आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं.

मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत केलेल्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, बिकट स्थितीतील अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन मिळालं. देशातील उद्योग क्षेत्रानं गती पकडली आणि त्याचा विस्तार झाला. महागाई नियंत्रणात ठेवली गेली आणि देशाचा विकासदर सातत्यानं उच्च पातळीवर, चांगला राहिला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'अपघातानं झालेला पंतप्रधान'

मनमोहन सिंगांना स्वत:च्या राजकारणी नसण्याची, राजकीय आधार नसल्याची पूर्ण जाणीव होती. यासंदर्भात ते एकदा म्हणाले होते की, "राजकारणी होणं चांगलं आहे. मात्र, लोकशाहीत राजकारणी होण्यासाठी तुम्ही आधी निवडणुका जिंकल्या पाहिजेत."

1999 मध्ये त्यांनी देशाच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी, काँग्रेस पक्षानं त्यांना वरच्या सभागृहात म्हणजे राज्यसभेत पाठवलं होतं.

2004 मध्ये देखील असंच घडलं होतं. त्यावर्षी मनमोहन सिंग पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झाले होते. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी मूळच्या इटालियन असल्यामुळे त्यावेळी विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर हल्ले चढवले जात होते, टीका केली जात होती.

त्यामुळे, काँग्रेस पक्षाचा बचाव करण्यासाठी सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारून मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केलं होतं, असं दिसत होतं. मात्र टीकाकारांचा आरोप होता की, मनमोहन सिंग पंतप्रधान असले, तरी खरं सत्ताकेंद्र सोनिया गांधी याच होत्या. खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग यांच्या हाती सत्ता कधीच नव्हती.

मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या 5 वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठं यश म्हणजे भारताचा अमेरिकेबरोबर झालेला ऐतिहासिक अणुऊर्जा करार होय. या करारामुळे अणुऊर्जेच्या पातळीवर वेगळा किंवा एकट्या पडलेल्या भारताला अमेरिकेच्या आण्विक तंत्रज्ञानाची दारं खुली झाली होती.

मात्र, मनमोहन सिंग यांच्या सरकारला या कराराची किंमत मोजावी लागली. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने या अणू कराराविरोधात निदर्शनं करत सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला होता.

त्यावेळी सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसला दुसऱ्या एका पक्षाचा पाठिंबा मिळवावा लागला होता. त्यातून काँग्रेसवर खासदारांची मतं विकत घेतल्याचा आरोप झाला होता.

सरकार चालवताना मनमोहन सिंग सहकारी आणि आघाडीतील घटक पक्षांची सहमती मिळवत वाटचाल करत होते. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांचं मत लक्षात घेऊन काम करणारा पंतप्रधान असंच त्यांच्याबद्दलचं मत होतं.

त्यावेळेस कधीकधी कठीण, ठाम आणि संभाव्यदृष्ट्या अनियंत्रित प्रादेशिक घटक पक्ष आणि समर्थकांच्या आघाडी सरकारचं त्यांनी नेतृत्व केलं.

त्यांच्या प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांनी सर्वांचाच आदर मिळवला होता. त्याचबरोबर अतिशय मवाळ स्वभाव आणि चटकन निर्णय न घेण्यासाठी देखील ते ओळखले जात होते.

काही टीकाकारांचं म्हणणं होतं की, मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणांचा वेग मंदावला होता. तसंच ते देशाचे अर्थमंत्री असताना आर्थिक सुधारणांची जी गती होती ती पंतप्रधान असताना राखण्यात त्यांना अपयश आलं होतं.

मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा दुसऱ्यांदा विजय झाला होता. त्यावेळेस त्यांनी निर्धार केला होता, "या कठीण प्रसंगातून पुढील वाटचाल यशस्वीपणे करण्यासाठी जे आवश्यक आहे ते काँग्रेस पक्ष करेल."

मात्र, त्यांच्या सरकारचं यश, चमक लवकरच संपुष्टात येऊ लागली. पंतप्रधानपदाचा त्यांचा दुसरा कार्यकाळ बहुतांश वेळा चुकीच्याच गोष्टींसाठी चर्चेत राहिला. त्यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांच्या अनेक घोटाळ्यांमुळे देशाचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याचा आरोप विरोधकांकडून झाला.

सरकारला धारेवर धरत तेव्हा विरोधकांनी संसदेचं कामकाज ठप्प केलं होतं. या राजकीय स्थितीचा सरकारच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होत होता. त्यावेळी आवश्यक असणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात सरकार कमी पडत होतं. त्याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर विपरीत परिणाम झाला.

त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांनी मनमोहन सिंग यांचं वर्णन, 'भारताचा सर्वात दुबळा पंतप्रधान' असं केलं होतं. मात्र, मनमोहन सिंग यांनी स्वत:चा बचाव करताना म्हटलं होतं की, त्यांच्या सरकारनं 'देशासाठी आणि देशातील जनतेच्या कल्याणासाठी अत्यंत कटिबद्धतेनं आणि समर्पणानं' काम केलं आहे.

व्यवहार्य परराष्ट्र धोरण

मनमोहन सिंग यांनी परराष्ट्र धोरण अमलात आणताना त्यांच्या आधीच्या दोन पंतप्रधानांनी अमलात आणलेलं व्यवहारी धोरणच पुढे नेलं.

त्यांनी पाकिस्तानबरोबरच्या शांततेच्या वाटाघाटी सुरू ठेवल्या. अर्थात, या शांतता प्रक्रियेत पाकिस्ताननं दहशतवादी हल्ले केल्याच्या आरोपांमुळे अडथळे निर्माण झाले होते. याची परिसीमा नोव्हेंबर 2008 मध्ये अवघ्या देशाला हादरवणाऱ्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झाली.

मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

मनमोहन सिंग यांनी चीनबरोबरचा सीमावाद संपवण्याचाही प्रयत्न केला होता. 40 वर्षांहून अधिक काळ बंद असलेली तिबेटला जोडणारी नथुला खिंड खुली करण्याचा करार करण्यात त्यांना यश आलं होतं.

त्यांनी अफगाणिस्तानला केल्या जात असलेल्या आर्थिक मदतीत वाढ केली. जवळपास 30 वर्षांनी अफगाणिस्तानला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते.

इराणसारख्या भारताच्या जुन्या मित्राबरोबरचे संबंध संपुष्टात आणले जात असल्याचे दिसत असल्यामुळे त्यांनी अनेक विरोधी राजकारण्यांचा रोष ओढवून घेतला होता.

प्रसिद्धीपासून दूर राहत काम करणारा नेता

एक अत्यंत अभ्यासू विद्वान आणि माजी नोकरशहा असलेले मनमोहन सिंग, प्रसिद्धीपासून किंवा सत्तेच्या झगमगाटापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी ओळखले जात होते. चर्चेत राहण्यापेक्षा ते नेहमीच कामावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर द्यायचे. त्यांचं एक्स (तेव्हाचं ट्विटर) हे सोशल मीडिया अकाउंट बहुतांश वेळा कंटाळवाण्या नोंदीसाठी प्रसिद्ध होतं. तसंच त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मर्यादितच होती.

मनमोहन सिंग कमी आणि मोजकंच बोलायचे. ते अत्यंत शांत स्वभावाचे होते. मात्र असं असूनदेखील त्यांचे अनेक प्रशंसक होते, त्यांनी अनेकांचा आदर संपादन केला होता.

परवान्यांचं बेकायदेशीर वाटप करण्यात आलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या कोळसा घोटाळ्यावरील प्रश्नांना उत्तर देताना या विषयावरील मौनाचा बचाव करताना ते म्हणाले होते, "हजारो उत्तरांपेक्षा मौन चांगलं."

2015 मध्ये त्यांना न्यायालयात हजर राहण्यास समन्स बजावण्यात आलं होतं. गुन्हेगारी कट, विश्वासभंग आणि भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं होतं. यामुळे मनमोहन सिंग अस्वस्थ, नाराज झाले होते. ते पत्रकारांना म्हणाले होते, "कायदेशीर छाननी किंवा प्रक्रियेसाठी ते तयार आहेत आणि सत्याचा विजय होईल."

मनमोहन सिंग आणि राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

पंतप्रधानाचा कार्यकाळ संपल्यानंतर वाढत्या वयाच्या मर्यादा असतानाही मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून मनमोहन सिंग त्या त्यावेळच्या प्रश्नांशी जोडलेले राहिले, भूमिका मांडत राहिले.

ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी एका दुर्मिळ मुलाखतीत बीबीसीला सांगितलं होतं की, कोरोनाच्या संकटामुळे देशाचं झालेलं आर्थिक नुकसान रोखण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी भारतानं 'तात्काळ' तीन पावलं उचलली पाहिजेत.

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी आली होती. त्याला तोंड देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी सूचना केली होती.

ते म्हणाले होते, "सरकारनं लोकांना थेट रोख रकमेद्वारे मदत करावी. व्यवसाय-उद्योगांसाठी भांडवल उपलब्ध करून द्यावं आणि वित्तीय क्षेत्राला पाठबळ देत संकटातून बाहेर काढावं."

मनमोहन सिंग

फोटो स्रोत, IndianNationalCongress/Facebook

सरतेशेवटी, इतिहासात मनमोहन सिंग यांची नोंद त्यांनी देशासाठी केलेल्या कामासाठी ठेवली जाईल. भारताला आर्थिक आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रातील संकटापासून बाहेर काढण्यासाठी इतिहास त्यांना स्मरणात ठेवेल. अर्थात, काही इतिहासकार असंही सुचवतील की त्यांनी आधीच निवृत्त व्हायला हवं होतं.

पंतप्रधान असताना त्यांच्यावर प्रसारमाध्यमांमधून आणि विरोधी पक्षांकडून झालेल्या टीकेसंदर्भात 2014 मध्ये एका मुलाखतकाराला मनमोहन सिंग म्हणाले होते, "मला प्रामाणिकपणं वाटतं की, समकालीन प्रसारमाध्यमं किंवा संसदेतील माझ्या विरोधी पक्षांपेक्षा इतिहासात माझी दखल अधिक दयाळूपणानं घेतली जाईल."

मनमोहन सिंग यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि तीन मुली आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)