कंबरेतून 24 तास वाहतं युरीन, तरी नागपूरची अबोली बनली व्हीलचेअर मॉडेल

आजारानं दोन्ही पाय निकामी झाल्यानंतरही अबोली व्हीलचेअर मॉडेल बनली.
फोटो कॅप्शन, आजारानं दोन्ही पाय निकामी झाल्यानंतरही अबोली व्हीलचेअर मॉडेल बनली.
  • Author, भाग्यश्री राऊत
  • Role, बीबीसी मराठीसाठी

"मी चार ते पाच महिन्यांची होती तेव्हा माझ्या आई-बाबांना समजलं की मला मूत्राशय (युरीनरी ब्लॅडर) नाहीये. त्यामुळे माझी युरीन सतत वाहत राहायचं. मी ओली-चिंब व्हायचे. ब्लॅडर नसल्यानं युरीन जमा राहत नव्हती. सतत वाहत राहायचं. मग माझं ऑपरेशन्स करून कंबरेच्या दोन्ही बाजूला दोन छिद्र केले.

"आता त्यातून माझी युरीन सतत वाहत असते. कधी थांबतच नाही. 24 X 7 सुरूच असते. तरीपण मला काही वाटत नाही. हे सगळं दुःख बाजूला ठेवून मी माझ्या टॅलेंटवर फोकस करते."

हे सांगताना एखाद्याला रडू येईल. पण, 21 वर्षांची अबोली जरीत मात्र सगळं काही अगदी हसतमुखानं सांगत होती.

अबोलीचं वय 21 वर्ष असलं तरी तिची उंची जेमतेम 3 फूट 4 इंच आणि आवाजही लहान मुलीसारखाच गोड.

व्हीडिओ कॅप्शन, मूत्राशय नाही, वाढ खुंटली तरी तिने हार नाही मानली

अबोली नागपुरातील धंतोली भागात राहते. तिची आई वनिता या खासगी रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन आहेत, तर वडील विजय जरीत निवृत्त आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आजारानं दोन्ही पाय निकामी तरीही...

अबोलीला जन्मापासूनच क्रोनिक किडनी डिसीज आहे. एक किडनी खराब, तर दुसरी आकारानं लहान आहे. तसेच युरीनरी ब्लॅडर नसल्यानं युरीन तिच्या कंबरेतून सतत वाहत असते. त्यासाठी तिला कंबरेभोवती डायपर बांधतात.

तसेच आजारामुळे तिचे हाडं खूप ढिसूळ झाले. तिला सतत अंगदुखी असते. या आजारामुळे तिचे दोन्ही पाय निकामी झाले. तिला चालताही येत नाही.

आपण दिव्यांग आहोत, आपल्याला इतका गंभीर आजार आहे असं समजून अबोली घरात बसत नाही, तर संधी मिळेल तेव्हा तिचं टॅलेंट दाखवत असते.

अबोलीला जन्मापासूनच क्रोनिक किडनी डिसीज आहे. एक किडनी खराब, तर दुसरी आकारानं लहान आहे.
फोटो कॅप्शन, अबोलीला जन्मापासूनच क्रोनिक किडनी डिसीज आहे. एक किडनी खराब, तर दुसरी आकारानं लहान आहे.

चालता येत असेल तरच मॉडेलिंग करता येतं हे अबोलीनं खोटं ठरवलं. ती व्हीलचेअरवरूनच मॉडेलिंग करतेय. तसेच तिला व्हीलचेअर मॉडेल म्हणून पारितोषिकही मिळाले.

अबोली सांगते, "इंडियाज दिव्यांग ग्लॅमर शो होता तिथं मी सहभाग घेतला. मी ग्रुमिंगसाठी गेले नाही. मी यूट्यूबवरून सगळं शिकले. आपल्या नखांपासून केसांपर्यंत परफेक्ट राहायला मला आवडतं. इतर स्पर्धक म्हणायचे ही ग्रुमिंगला आली नाही तरी जिंकली कशी? त्यांनी माझ्यावर खूप टीका केली. पण, सगळ्यांना हसत हसत उत्तर दिलं."

अबोलीची ही पहिली मॉडेलिंगची स्पर्धा होती. त्यानंतर तिनं अनेक मॉडेलिंग शो गाजवले आणि व्हीलचेअर मॉडेल म्हणून ओळख निर्माण केली.

इंडियन आयडॉलमधून झळकली टीव्हीवर

अबोली फक्त मॉडेलिंगच करत नाही तर ती एक गायिका सुद्धा आहे. 2018 मध्ये 'सारेगम लिटल चॅम्प्स' मध्ये तिची निवड झाली होती.

तिसऱ्या राऊंडपर्यंत ती या शोमध्ये होती. पण, पुढच्या राऊंडसाठी तिची निवड झाली नाही. त्यानंतर 2019 मध्ये इंडियन आयडॉलसाठी तिनं ऑडिशन दिलं.

त्यातही तिची निवड झाली. मुंबईला जाऊन तिन राऊंड पूर्ण केले. तसेच 12 ऑक्टोबर 2019 ला ती इंडियन आयडॉलमधून टीव्हीवर झळकली.

अबोली

फोटो स्रोत, aboli__jarit

फोटो कॅप्शन, अबोलीने लहान लिटल चॅम्प्समध्ये ही सहभाग घेतला होता. प्रसिद्ध गायिका नेहा कक्करसोबत अबोली

अबोली सांगते, "आम्ही शूटसाठी मुंबईतल्या फिल्म सिटीत गेलो तेव्हा आई घाबरत होती. पण, मी नाही घाबरले. कारण, मला आता कशाचीच भीती वाटत नाही. मी टीव्हीवर दिसले तेव्हा जे लोक नकारात्मक बोलायचे ते पण चांगला विचार करू लागले. म्हणताना ना प्यार दो प्यार लो असंच माझ्यासोबत घडलं."

अबोलीला संगीताची कुठलीही शिकवणी नाही. ती घरीच गाणं शिकली.

अबोली घरी गाण गुणगुणत असायची. पण, पहिल्यांदा तिनं बालदिनाच्या एका कार्यक्रमात गाणं गायलं. त्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि सारेगम लिटल चॅम्प्स आणि इंडियन आयडॉलमध्ये निवड झाल्याचं अबोली सांगते. अबोलीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नेहा कक्करसोबतचा व्हीडिओही शेअर केला आहे.

'पैरों के बिना डान्स'

यासोबतच अबोली उत्तम नृत्यही करायची अशी तिची आई वनिता सांगते. पण, अबोली आठवीत असताना तिचा आजार वाढला आणि तिचे दोन्ही पाय निकामी झाले.

तिला चालताच येत नव्हते. त्यामुळे डान्स बंद झाल्याची खंत अबोली बोलून दाखवते. पण, यावेळीही ती निराश झाली नाही.

"मी स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. यात मी गायनाचे व्हीडिओ टाकत होते. पण, त्यासोबतच आणखी काय टाकायचं हा प्रश्न होता. मग मी माझी एक टॅगलाईन बनवली 'इरादे बुलंद हो तो पैरों के बिना भी डान्स किया जा सकता हैं'. यावेळी माझ्यावर टीका झाली. पाय नसताना डान्स कशी करणार असं सगळे बोलू लागले. पण, बसल्या बसल्या हाताची अॅक्शन आणि चेहऱ्यावरच्या हावभावानं मी डान्स करून अशा लोकांना उत्तर दिलं," अबोली सांगते.

अबोली आताही तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर डान्सचे व्हीडिओ टाकत असते. तिचे इंस्टाग्रामवर सध्या 28 हजार 200 फॉलोअर्स आहेत.

तिच्यावर 2022 मध्ये लंडनमधील 'Truly' या चॅनलने डाक्युमेंट्रीही बनवली आहे. तसेच ती 'ग्लिटरीस्ट' या कोलाकात्याच्या मॅगझीनसह आणखी तीन मॅगझिनमध्येही ती 'कव्हर गर्ल' म्हणून झळकली आहे.

पदवीपर्यंतचं शिक्षण केलं पूर्ण

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातील घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

फक्त कलात्मक क्षेत्रातच नाहीतर अबोलीनं तिचं पदवीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं. पण, शिक्षण घेताना सुरुवातीला कशा अडचणी आल्यात याबद्दल अबोलीनं तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.

ती सांगते, "मी लहानपणापासून आजारी होते. पण, तेव्हा मला चालता येत होतं. म्हणून मला नर्सरीत प्रवेश द्यायचं ठरवलं. आई-बाबा एका नर्सरीत घेऊन गेले. तेव्हा त्यांनी मला प्रवेश द्यायला नकार दिला. माझ्या आजाराचा संसर्ग इतर मुलांना होईल असं ते म्हणायचे. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि माझा आजार संसर्गजन्य आहे का हे विचारलं.

"तेव्हा माझ्या आजारामुळे कोणाला कुठलाही संसर्ग होत नसल्याचं प्रमाणपत्र आम्हाला डॉक्टरांनी दिलं. त्यानंतर मला नर्सरीत प्रवेश तर मिळाला. पण, त्यांनी दुसऱ्या दिवशी मला काढून टाकलं. त्यानंतर मला कुठंच प्रवेश मिळाला नाही."

नर्सरीत प्रवेश मिळत नसल्यानं कॉन्व्हेंटचं शिक्षण तिनं घेतलं नाही. काही वर्ष थांबून अबोलीनं थेट पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. यातही आठवीपर्यंत ती दररोज शाळेत जात होती. पण, आठवीत असताना अचानक आजार वाढला आणि तिचं शाळेत जाणंही बंद झालं. अशा परिस्थितीत तिनं घरात अभ्यास करूनच पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

'दिव्यांगांना घरात बसवून ठेवू नका'

अबोलीची उंची कमी असल्यानं काही लोक हिणवतात. ही एवढीशी आहे मग 21 वर्षांची कशी काय असंही विचारतात. पण, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. जिंदगी हैं, एक ही तो बार मिलती हैं. जितनी अच्छे से जिनी जी लो, असं अबोली सांगते.

ती पुढे म्हणते, "घरातून पाठिंबा मिळाला म्हणूनच मी सगळं करू शकले. माझ्या घरातले सगळे मला खूप सपोर्ट करतात. जर माझं कुटुंब चांगलं नसतं तर मी पुढे जाऊ शकली नसती. असे खूप लोक असतात जे एखादी दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना घरातच बसवून खाऊ घालतात. त्यांची आवड जोपासण्याचा प्रयत्न करत नाहीत. टॅलेंटला वाव देत नाहीत.

"माझे पण असे काही मित्र आहेत ज्यांना घरातून पाठिंबा मिळत नाही. पण, माझ्या कुटुंबानं मला पाठिंबा, प्रेम, आशीर्वाद, मदत सगळं दिलंय."

सोबतच अबोली इतर दिव्यांगाच्या आई-बाबांना सल्लाही देते. ती म्हणते, "आपल्याकडे कोणी दिव्यांग असतील तर त्यांना पाठिंबा द्या. त्याला विचारा तुला नेमकं काय करायचं आहे? त्याच्यामध्ये असणाऱ्या टॅलेंटला सपोर्ट करा, त्याला घरातल्या एका कोपऱ्यात बसवून ठेवू नका."

आई-वडिलांनी प्रत्येक टप्प्यावर साथ दिल्याचं अबोली सांगते.
फोटो कॅप्शन, आई-वडिलांनी प्रत्येक टप्प्यावर साथ दिल्याचं अबोली सांगते.

अबोलीचे पाय निकामी असतानाही ती व्हीलचेअरनं सहज इक- तिकडे फिरू शकते असंही नाही. तिच्या आजारामुळे दिवसेंदिवस तिची हाडं अधिकच ढिसूळ झालेत. त्यामुळे तिला झोपेतून उठवण्यापासून तर सगळ्या कामासाठी कोणीतरी सतत जवळ लागतं.

अबोलीची आई सांगते, "तिला सकाळीच झोपेतून उठवून बसवावं लागतं. युरीनमुळे ती पूर्ण भिजलेली असते. त्यामुळे तिचे पूर्ण कपडे बदलून तिचं अंग पुसून द्यायचं असतं. कारण, तिच्या अंगदुखीमुळे तिला दररोज आंघोळही घालता येत नाही. तिला उचलून व्हिलचेअरवर ठेवायचं असेल तरी त्याला अर्धा तास लागतो.

"आधी तिच्या मागे एक उशी ठेवून ती थोडी पुढे सरकते. त्यानंतर एक एक करत पाच उश्या मागे ठेवून ती सोफ्याच्या काठावर येते. त्यानंतर हळुच पाय पुढे करून 15 मिनिटं आराम करते. कारण, तिला प्रचंड दम लागतो. त्यानंतर ती हळूहळू खाली पाय टेकवते आणि त्यानंतर तिची आत्या तिला उचलून व्हीलचेअर चेअरवर ठेवते."

अबोली व्हीलचेअरवरुन बाहेर फिरायला जायची. फूड ब्लॉग बनवायची. त्यासाठी तिचे बाबा तिला बाहेर घेऊन जात होते. पण, गेल्या एक महिन्यात तिची तब्येत खूप खराब झाली. आता तिचं डायलिसिस होऊ शकत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलंय.

अबोलीला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तरीही अबोली निराश झाली नाही. औषध खायचं आणि राहायचं. आपले गायनाचे, मॉडलिंगचे स्वप्न पूर्ण करत जगायचं, असं अबोली बोलून दाखवते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.