तंबोरा
एक तंतुवाद्य | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | necked bowl lutes sounded by plectrum | ||
---|---|---|---|
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
तंबोरा किंवा तानपूरा एक तंतुवाद्य आहे. हे वाद्य भारतीय शास्त्रीय संगीतातील अतिशय प्राचीन आणि गायकांकरीता उपयुक्त वाद्य आहे.
तंबोऱ्याच्या खुंट्या
[संपादन]तंबोरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,)
तंबोऱ्याचा भोपळा
[संपादन]तानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता हा भोपळाच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तानपुऱ्याची तार छेडल्यावर त्यातनं जो टणकार उमटतो तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्याच्या स्वरूपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो. तानपुऱ्याकरता लागणाऱ्या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून त्यातील मगज बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात.
घोडी किंवा ब्रिडज
[संपादन]घोडी किंवा ब्रिज हा तंबोऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तंबोऱ्याच्या तारा ह्या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अश्या बांधलेल्या असतात. त्या तारा ह्या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचे काम ही घोडी करते.
जवार आणि मणी
[संपादन]जवार किंवा जवारी हिला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेजारील चित्र नीट पाहिले असता त्यात तानपुऱ्याच्या तारा घोडीवरून गेलेल्या दिसतात आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली एक बारील दोरा दिसतो. तानपुऱ्यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुऱ्याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुऱ्याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय निगुतीने व काळजीपूर्वक पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुऱ्यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.
हा दोरा जरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हालला तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातनं अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो.
तंबोरा कारागिरीत पिढ्यान पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, पं फिरोज दस्तूर, पं भीमसेन जोशी, पं कुमार गंधर्व ही मंडळी जवारीचे काम जाणतात. उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत या मंडळींचा अधिकार आहे. घोडीच्या पुढे दिसणारे मणी हे तंबोऱ्याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात.
तानपुऱ्याचे लागणे (ट्युनींग)
[संपादन]तंबोऱ्याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम, किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना 'जोड' असे म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.