ब्राझील जैर बोल्सोनारोंचा पराभव: या निवडणूक निकालाचा अर्थ काय?
- Author, व्हेनेसा बुशश्युलटर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये अतिउजव्या विचारांच्या जैर बोल्सोनारो यांचा पराभव झाला आहे. लुईझ इनाशिओ लुला डी सिल्व्हा या डाव्या विचारांच्या नेत्याने बोल्सोनारो यांचा पराभव केला आहे.
लुला यांना 50.9 टक्के मतं मिळाली. प्रचारदरम्यान दोन्ही नेत्यांची जोरदार टक्कर झाली होती. बोल्सोनारो यांच्या समर्थकांना विजयाची खात्री होती.
या निवडणुकीत देश विभागला गेला होता. आता निवडणुकांचे निकाल आले असले तरी देशात जी फूट पडली ती इतक्या लवकर भरून निघणार नाही.
लुला डी सिल्व्हा यांनी सत्ता हस्तगत करणं ही मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे कारण गेल्या निवडणुकांमध्ये (2018 साली) ते तुरुंगात होते. त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आलं होतं.
ब्राझिलियन बांधकाम कंपनीकडून लाच घेतल्या प्रकरणी त्यांना शिक्षा झाली होती.
लुला 580 दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांची शिक्षा रद्द झाली आणि त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली.
आपल्या भाषणात बोलताना लुला म्हणाले, "त्यांनी मला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला पण मी इथे तुमच्यासमोर उभा आहे."
लुला यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
ओपिनियन पोल्सनी भाकीत केलं होतं की लुला ही निवडणूक जिंकतील पण पहिल्या फेरीअखेर लुला आणि बोल्सोनारो यांच्यात अतिशय कमी मतांचा फरक होता त्यामुळे अनेक ब्राझिलियन नागरिकांना वाटायला लागलं की हे भाकीत खरं ठरणार नाही.
जैर बोल्सोनारो यांच्या समर्थनकांनी म्हटलं होतं की व्यवस्था आणि मीडिया त्यांच्याविरोधात आहेत त्यामुळे बोल्सोनारो यांना असलेला लोकांचा पाठिंबा ते दाखवत नाहीयेत आणि असं चित्र उभं करत आहेत की त्यांचा पराभव होईल.
लुला यांच्या विजयामुळे बोल्सोनारो यांच्या समर्थकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी लुला यांना नेहमीच 'चोर' म्हटलं आहे. त्यांची शिक्षा रद्द झाल्यावरही या समर्थकांनी आरोप केला की योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही.
आता जरी बोल्सोनारो यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरली असली तरी त्यांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे लुला यांच्यासाठी मार्ग सोप असणार नाही.
लुला यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला काँग्रेसमधून जोरदार विरोध होईल.
अर्थात लुलाही ब्राझीलचे 2003-2010 या काळात राष्ट्राध्यक्ष होते त्यामुळे मोडतोडीचं राजकारण त्यांनाही नवीन नाही.
त्यांनी त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून आपलेच माजी विरोधक जेराल्डो अक्लमिन यांची निवड केली. अक्लमिन यांनी आधी लुला यांच्याविरोधात निवडणुका लढल्या आहेत.
लुला यांनी धोरणीपणाने 'एकतेचा' संदेश देऊ केला जो मतदारांच्या पसंतीस उतरलेला दिसतोय.
त्यांच्या विजयाच्या भाषणात त्यांनी म्हटलं की, "ते फक्त त्यांच्या मतदारांसाठी काम न सगळ्या ब्राझिलिझन नागरिकांसाठी काम करतील.
"या देशाला शांतता हवीये. इथल्या लोकांना आता संघर्ष करायचा नाहीये," ते म्हणाले.
जैर बोल्सोनारो यांनी अजून आपला पराभव स्वीकारला नाहीये. संपूर्ण प्रचारात त्यांनी हा मुद्दा उचलला होता की ब्राझीलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेवर(EVM) विश्वास ठेवता येणार नाही. काहीही गडबड होऊ शकते. अर्थात याचा त्यांनी काहीही पुरावा दिलेला नाही.
बोल्सोनारो यांनी म्हटलं होतं की त्यांच्या विरोधात निकाल आले तर ते असे निकाल कदाचित मान्य करणार नाहीत.
पण मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीआधी त्यांनी म्हटलं की, "ज्याला जास्त मतं असतील तो जिंकेल यात काही वादच नाहीये. यालाच लोकशाही म्हणतात."
बोल्सोनारो यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
निवडणुकीच्या दिवशी मतदारांना घेऊन जाणाऱ्या बसेस पोलिलांनी थांबवल्या होत्या. यावर लुला यांच्या प्रचार टीमने म्हटलं होतं की लोकांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी असं करण्यात आलं होतं.
ब्राझीलच्या निवडणुक आयोगाचे प्रमुख अॅलेक्झाड्रे डी मोराईस यांनी हायवे पोलिसांना आदेश दिले की कुठेही नाकाबंदी करायची नाही.
त्यांनी म्हटलं की काही मतदारांना मतदान करायला उशीर झाला पण कोणीही मतदान करण्यापासून वंचित राहिलं नाही.
या प्रकरणामुळे काही काळासाठी तणावाचं वातावरण तयार झालं होतं.
आता बोल्सोनारो काय प्रतिक्रिया देतात यावर सगळ्यांचं लक्ष आहे.
या निवडणुकीवर ब्राझीलसह इतर देशांचं लक्ष होतं, विशेषतः पर्यावरणवादी पुन्हा बोल्सोनारो सरकार सत्तेत आलं तर त्यांचा अॅमेझॉनच्या जंगलतोडीवर काय परिणाम होईल याबद्दल चिंतेत होते.
बोल्सोनारो यांच्या काळात आधीच या वर्षावनांची प्रचंड प्रमाणात तोड झालेली आहे.
लुला यांनी म्हटलंय की ते, "अॅमेझॉनच्या जंगलांची तोड थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा स्वीकार करण्यासाठी तयार आहेत."
लुला आपल्या भाषणात म्हणाले, "मी आज जगाला सांगू इच्छितो की ब्राझील परत आलाय."
आपल्या प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना ते म्हणाले, "ब्राझीलला जणूकाही जगातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. पण हा नवा ब्राझील आहे, हा जगाच्या नजरेत व्हिलन ठरणार नाही."
लुला यांनी आपल्या भाषणात म्हटलं ती ते ब्राझीलमध्ये सतत वाढणाऱ्या उपासमारीवर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहेत. सध्या ब्राझीलमध्ये 3 कोटीहून जास्त लोक उपासमारीला बळी पडतात.
लुला आधी राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या मतदारांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते कारण त्यांनी हजारो नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं होतं.
पण आता कोव्हिडोत्तर अर्थव्यवस्थेत याची पुनरावृत्ती करणं अवघड असेल, विशेषतः काँग्रेस हातातून गेली असताना.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)