'भारतीय चित्रपट सृष्टीने आंबेडकरांवर बहिष्कारच टाकला आहे‌', असे अभ्यासकांना का वाटते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीम चित्रपटाचे पोस्टर अशा दोन फोटोंचा कोलाज आहे.

फोटो स्रोत, BBC/@2D_ENTPVTLTD

फोटो कॅप्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीम चित्रपटाचे पोस्टर.
  • Author, डॉ. हरीश वानखेडे
  • Role, बीबीसी मराठीसाठी

2024 हे वर्ष अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमुळे भारतीय चित्रपट सृष्टीसाठी ऐतिहासिक ठरणारं आहे. यावर्षी आलेल्या स्त्री-2, भूल भुलैय्या-2 आणि सिंघम अगेन यांसारख्या चित्रपटांनी तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा गल्ला जमवत कमाईचे नवे विक्रम रचले‌. भारतातील या चित्रपट उद्योगाची उलाढाल अवाक करणारी आहे‌.

ॲक्शन, ड्रामा, रोमान्स, गाणी आणि संगीत असं सगळ्यांचंच मिश्रण असणारे भारतीय चित्रपट देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्शकांसाठीही आकर्षणाचा विषय बनलेले आहेत‌. त्यामुळे या चित्रपटांची देशाबाहेरील आंतरराष्ट्रीय कमाईदेखील तितकीच घसघशीत झालेली पाहायला मिळते.

पण इतक्या मोठ्या व्यावसायिक यशानंतरही कलात्मकता, बौद्धिक आशय आणि सामाजिक विषयांवरील भाष्य या बाबतीत भारतीय सिनेमा आजही कच खाताना दिसतो.

हॉलीवूड आणि युरोपातील चित्रपटातून शोषित-वंचित समूहाच्या गोष्टी धाडसीपणाने दाखवल्या जातात. सामाजिक विषयांवरती आशयघन चर्चा तिथल्या चित्रपटांमधून होते. कारण तिथे चित्रपटांकडे फक्त मनोरंजनाचं नव्हे, तर लोकांनी वैचारिक जडणघडण करण्याचं साधन म्हणूनही पाहिलं जातं‌.

त्यामुळे परदेशी चित्रपटांमधून समाजातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडलेली पाहायला मिळते.

मनोरंजनाबरोबरच सामाजिक भान जपण्याची जबाबदारीही बाहेरचा सिनेमा उचलतो. आपल्या भारतीय चित्रपटांमध्ये दुर्दैवानं असं होताना दिसत नाही. आपले बहुतांश सिनेमे हे तद्दन व्यवसायिक गल्लाभरूच असतात.

डोकं बाजूला ठेवून फक्त मनोरंजन करण्यासाठीच आपले सिनेमे बनवले जात आहेत, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. भारतातील शोषित-वंचित समूहांचे प्रश्न भारतीय सिनेमांमधून मांडले गेलेत, हे अभावानेच पाहायला मिळतं‌.

भारतीय चित्रपटांमध्ये इथल्या दलित-आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व जवळपास शून्यात जमा आहे‌.

'भारतीय चित्रपटसृष्टीत आंबेडकरांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातंय का?'

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे महामानव म्हणून गणले जातात. आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा वाटा फार मोठा आहे. पण भारतीय चित्रपटसृष्टीनं आंबेडकरांचं योगदान कायमच अनुल्लेखानं नाकारलेलं आहे.

दलित समूहाचे प्रश्न, त्या अनुषंगाने येणारे राजकीय आणि सामाजिक मतप्रवाह भारतीय सिनेमात अभावानेच पाहायला मिळतात. आंबेडकरांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातंय का? साहजिकच असा प्रश्न यानिमित्तानं उभा राहतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबर्ग यांनी गांधींवर बनवलेल्या चित्रपटात देखील आंबेडकरांचं प्रकरण वगळून टाकण्यात आलेलं होतं. प्रत्यक्षात या काळात गांधींना समकालीन असणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये आंबेडकरांची गणना होते.

या चित्रपटात इतर समकालीन लोकांचा उल्लेख (नेहरू, भगतसिंग, पटेल इत्यादी) गांधींच्या निमित्ताने वारंवार होतो. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा या चित्रपटांना सोईस्करपणे विसर पडलेला आहे, हे स्पष्टपणे जाणवतं आणि हे फक्त या एकाच चित्रपटापुरतं मर्यादित नाही.

'भारतीय चित्रपट सृष्टीने आंबेडकरांवर बहिष्कारच टाकला आहे‌'

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट सांगणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये गांधी, नेहरू, भगत सिंग, सुभाषचंद्र बोस यांचं इतिहासाचे नायक आणि देशाचे निर्माते म्हणून दैदिप्यमान चित्रण केलं जातं. पण आंबेडकरांच्या योगदानाचा उल्लेख मात्र या चित्रपटांमधून फारसा होताना दिसत नाही.

जाती व्यवस्थेविरूद्ध आंबेडकरांनी दिलेला लढा, आंबेडकरांनी घडवून आणलेल्या सामाजिक सुधारणा आणि दलित बहुजनांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेला अविरत संघर्ष मुख्यधारेतील भारतीय चित्रपटांमध्ये अपवादानेच रेखाटलेला पाहायला मिळतो. एका अर्थाने भारतीय चित्रपट सृष्टीने आंबेडकरांवरती बहिष्कारच टाकलेला आहे‌.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, BMC

1990 च्या दशकापर्यंतच्या सिनेमांमध्ये आंबेडकरांचा आणि दलितांच्या प्रश्नांचा साधा उल्लेखही दिसून येत नाही. नाही म्हणायला कलात्मक अथवा समांतर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही चित्रपटांनी हा विषय हाताळण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला होता.

उदाहरणार्थ 1975 साली प्रदर्शित झालेला 'निशांत' हा चित्रपट दलितांवरील अत्याचाराला वाचा फोडतो. 1981 सालच्या 'पार' या चित्रपटात जातीच्या आधारावर केलं जाणारं शोषण दाखवलं गेलं.

'दामुल' हा 1985 साली आलेला चित्रपट जाती आधारित हिंसाचारावर भाष्य करतो. पण जातीय शोषणावर आधारलेले असूनही या चित्रपटांमध्ये आंबेडकरांचा नामोल्लेखही आढळून येत नाही. जात हा भारताच्या सामाजिक अस्तित्वाचा आधार आहे.

यासंबंधी आंबेडकरांचं काम मूलगामी आहे. विशेष म्हणजे याच काळात मुंबईमध्ये दलित पँथरचा उदय झाला होता. ही संघटना दलितांवरील अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारणाऱ्या तरूणांनी स्थापन केली होती.

लाल रेष
लाल रेष

'मुंबई दलित पँथरचं उगमस्थान, मग हिंदी चित्रपटसृष्टीत कुठलीच नोंद का नाही?'

दलित पँथर स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक निर्णायक आणि तितकंच क्रांतिकारी प्रकरण आहे. दलित पँथरच्या उदयाने जातवास्तव आणि जातीय शोषणाचा प्रश्न नव्या दमानं अधोरेखित झाला.

पहिल्यांदा मुख्यधारेतील राजकारणात दलित आवाजाला या निमित्ताने प्रतिनिधित्व मिळालं होतं‌. जाती आधारित शोषणाचा प्रतिकार करणारी नवी भाषा, नवा जोश दलित पँथरनं देशभरात जागवला. मुंबई हे दलित पँथरचं उगमस्थान होतं.

या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विक्री करणारी व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूला आंबेडकर आणि बुद्धांच्या फोटो फ्रेम दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

हिंदी चित्रपटसृष्टी देखील मुंबईमधूनच चालते. पण या नव्या दलित अस्मितेची कुठलीच नोंद हिंदी चित्रपट सृष्टीने घेतली नाही. देशभरात नव्या दमाच्या या आक्रमक दलित अस्मितेनं जन्म घेतलेला असताना या काळातल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्याचं कुठलंच प्रतिबिंब पडलेलं दिसलं नाही.

दलितांविषयी आणि जातीच्या प्रश्नाविषयी चित्रपत्रसृष्टीची ही अनास्था जितकी विस्मयकारक तितकीच खेदजनक म्हणावी लागेल.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक-राजकीय उलथापालथीचं कसलंच भान या चित्रपटसृष्टीला नव्हतं. याच काळात म्हणजे 1990 च्या दशकात आंबेडकरी विचारधारेचा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयाला आला.

मुख्यधारेतील राजकारणात आंबेडकरी विचारधारेचा पक्ष इतक्या ताकदीने पुढे येतो आणि भारताच्या सर्वांत मोठ्या राज्यात सत्तास्थानी विराजमान होतो ही एक असामान्य घटना होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकरी विचारधारा देशभरात इतक्या जोरकसपणे आपली छाप सोडत असताना समकालीन चित्रपटांमध्ये त्याचं कुठलंच प्रतिबिंब उमटलेलं दिसत नव्हतं‌. हे चित्रपट उच्चवर्णीयांचीच आवड आणि हितसंबंध जपण्यात मश्गूल होते.

1990 च्या दशकानंतर यात थोडासा बदल झालेला पाहायला मिळाला. त्यावेळी केंद्रात व्ही. पी. सिंग यांचं सरकार होतं. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने सामाजिक न्यायाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करायला सुरुवात केली. सरकारच्या वरदहस्तामुळे चित्रपटांमध्ये सुद्धा आंबेडकरांना आणि दलितांच्या प्रश्नांना योग्य ते स्थान मिळायला सुरुवात झाली.

दिग्दर्शक जब्बार पटेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिग्दर्शक जब्बार पटेल

1994 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बनलेला चरित्रात्मक चित्रपट केंद्रातील सामाजिक न्याय मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारातूनच आकाराला आला. हा चित्रपट जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला होता.

अर्थात हा काही तद्दन व्यावसायिक चित्रपट नसल्यानं तो काही सगळ्या सिनेमागृहांमध्ये झळकला नाही. मनोरंजनापेक्षा शैक्षणिक हेतूने बनवलेला असल्यामुळे हा चित्रपट काही फार चालला नाही. पण आंबेडकरांचा जीवनपट पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दाखवण्याचं महत्त्वाचं काम या चित्रपटानं केलं.

दलित प्रतिकाराला पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर स्थान कधी मिळालं‌?

या हिंदी चित्रपटानंतर मग प्रादेशिक भाषांमध्ये देखील आंबेडकरांचे चरित्रपट निघायला लागले. उदाहरणार्थ 1990 साली आलेला 'भीम गर्जना' हा मराठी चित्रपट आणि 1992 सालचा 'डॉक्टर आंबेडकर' हा तेलगू चित्रपट. या जीवनपटांमुळे मुख्यधारेतील सिनेमा संस्कृतीत आंबेडकरांना स्थान मिळायला सुरुवात झाली.

प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी 1994 साली बनवलेला 'बंडिट क्वीन' हा चित्रपट बंडखोर फूलन देवीच्या आयुष्यावर आधारलेला होता. फूलन देवी हे उच्चवर्णीय दलितांवर करत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात पुकारलेल्या बंडाचं प्रतीक होती.

या चित्रपटामुळे दलित प्रतिकाराला पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर स्थान मिळालं‌. पण हे काही मोजके चित्रपट फक्त अपवाद म्हणूनच राहिले. बोटांवर मोजता येईल इतपतच त्यांनी गणती होते. अन्यथा 90 च्या दशकातील बहुतांश मुख्यधारेतील सिनेमा हा जातीव्यवस्थेच्या सामाजिक वास्तवापासून कोसो दूरच राहिला.

फूलन देवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फूलन देवी

आंबेडकरांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

आंबेडकरांना रुपेरी पडद्यावर कलात्मकरित्या दाखवण्याचा प्रघात हा मागच्या एका दशकभरापासूनच सुरू झालेला पाहायला मिळतो. दलित बहुजन समाजातून आलेल्या दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तशी त्यांनी आपल्यासोबत या चित्रपटांमधून स्वत:चं सामाजिक भान आणि जातवास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.

या दलित कलाकारांच्या आगमनामुळे चित्रपटांमध्ये एक नवं दलित सौंदर्यशास्त्र विकसित व्हायला सुरुवात झाली. जे आत्तापर्यंतच्या सिनेमातील उच्चवर्णीय सौंदर्यशास्त्राला छेद देणारं होतं.

उदाहरणार्थ नागराज मंजुळे यांनी आपल्या 'फॅन्ड्री' (2013) या चित्रपटात आंबेडकर, फुले आणि शाहू महाराजांच्या प्रतिमा वापरल्या आहेत.

ग्रामीण भागात आजही जातीव्यवस्था किती घट्ट रुजून बसलेली आहेत, यावर उपरोधिक भाष्य करणाऱ्या या प्रतिमा आपल्या चित्रपटातून मंजुळेंनी अतिशय कलात्मकतेनं वापरल्या आहेत.

नागराज मंजुळे

फोटो स्रोत, Facebook/Nagraj.Manjule

फोटो कॅप्शन, नागराज मंजुळे

'झुंड' (2021) या आपल्या पुढच्याच चित्रपटामधून नागराज मंजुळेंनी आंबेडकर जयंती सार्वजनिकरित्या साजरा करणारं दृश्य दाखवलं. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन या कथेतील प्रमुख पात्र होतं.

'हिंदी चित्रपटात आंबेडकर जयंतीचा प्रसंग दाखवण्याची पहिलीच वेळ'

मुख्यधारेतील व्यावसायिक हिंदी चित्रपटात आंबेडकर जयंतीचा प्रसंग दाखवला जाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. चित्रपटातील या दृश्यात दलित समाजातील लोक उत्साह आणि आनंदाने नाचत आणि वाजत-गाजत आंबेडकर जयंती साजरी करताना दिसतात.

आंबेडकर हे फक्त जातीव्यवस्थेविरूद्धच्या लढ्याचे मुख्य शिलेदारच नव्हे, वंचित-शोषित समूहांसाठी प्रेरणा आणि उत्सवाचं प्रतीक आहे, हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम या चित्रपटानं केलं.

झुंड चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, T-Series/Screengrab

फोटो कॅप्शन, झुंड चित्रपटातील दृश्य

आंबेडकरांची महती आणि दलितांच्या आयुष्यातील त्यांचं स्थान आजही किती अढळ आहे, हे अधोरेखित करणारी ही प्रतिमा जनमानसात नागराज मंजुळेंनी पेरली‌.

पूर्वीच्या तुलनेत आता चित्रपटांमधून आंबेडकरांचं अस्तित्व वारंवार अधोरेखित होतं. पोलीस स्टेशन, न्यायालयीन कचेरी अथवा सरकारी कार्यालयातील भिंतीवर आंबेडकरांची अडकवलेली प्रतिमा अनेक फ्रेम्समधून आजकालच्या चित्रपटांमध्ये आढळून येते.

अर्थात सरकारी अनास्था उपरोधिकपणे दर्शवण्यासाठी या प्रतिमा पेरल्या जात असल्या, तरी त्याने या देशाच्या जडणघडणीत आंबेडकरांचं असलेलं योगदान अधोरेखित होतं, हे महत्वाचं.

न्युटन चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, Instagram/RajkumarRaOfficial/Drishyam Films

फोटो कॅप्शन, न्यूटन चित्रपटाचे पोस्टर

या प्रतिकात्मक वापराव्यतिरिक्त कथेचा मुख्य नायक अथवा कथेच्या पात्रांची प्रेरणास्थान म्हणूनही आंबेडकरांचा या चित्रपटांमध्ये होणारा वावर दिसू लागला आहे. अशा पद्धतीने आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून जातवास्तव अधोरेखित करणाऱ्या आशयघन चित्रपटांचा एक नवीन प्रकार दलित सिनेमा या नावाने उदयाला येताना दिसतो आहे. अमित मासुरकरांचा 2017 साली आलेला 'न्यूटन' हा तसा सिनेमा म्हणता येईल.

या चित्रपटात देखील आंबेडकरांचा एक फोटो काही सेकंदासाठी एका फ्रेममध्ये भिंतीवर अडकवलेला दिसतो. पण तो फक्त प्रतिकात्मक म्हणून राहत नाही. कथेच्या मुख्य नायकाची संवैधानिक मूल्यांप्रतीची निष्ठा आणि कर्तव्याची जाणीव या एका फ्रेममधून अतिशय कलात्मकरित्या प्रेक्षकांच्या मनामध्ये पेरण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो.

'न्यूटन' हा कथेचा नायक आंबेडकरांच्याच मूल्यांवरती ठाम राहून आपलं उद्दिष्ट गाठण्यात कसा यशस्वी होतो, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.

तमिळ दिग्दर्शक पा रंजीत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तमिळ दिग्दर्शक पा रंजीत

पा रंजीत या तमिळ दिग्दर्शकाने सुद्धा आपल्या चित्रपटांमधून आंबेडकरांचा महिमा प्रभावीपणे ठसवला आहे. पा रंजित यांच्या प्रत्येक चित्रपटात आंबेडकरांचं नाव, फोटो, पुतळा, घोषणा आणि इतर दलित प्रतिकं झळकताना दिसतात. आणि हा वापर फक्त प्रतिकांपुरता मर्यादित नसतो. दलितांचं अस्तित्व आणि दलित अस्मिता प्रकर्षाने अधोरेखित करत त्यांच्या चित्रपटाची कथा पुढे सरकत राहते.

उदाहरणार्थ 'कबाली' (2016) या चित्रपटातील नायकाचं (जो रजनीकांत यांनी साकारला) प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकर असतात. स्वतः दलित असलेला हा नायक दलितांनी चांगले कपडे घालणं का महत्वाचं आहे? हे पटवून सांगतो.

बाबासाहेब आंबेडकरांची देखील वेशभूषा कायम टापटीप असायची. यातून दलितही उच्चवर्णीयांच्या बरोबरीचा आहे, हा संदेश आंबेडकरांना द्यायचा होता. रजनीकांतचं पात्र देखील या चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांच्या याच संदेशानुसार वागतं.

कबाली चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, twitter/@rajini_mano

फोटो कॅप्शन, कबाली चित्रपटाचे पोस्टर

शोषित वंचित समूहानं आपल्यावरील अन्याय अत्याचाराविरोधात उच्चवर्णीयांना आव्हान देताना आंबेडकरांच्या प्रतिमेचा प्रतिकात्मक वापर चित्रपटात अतिशय प्रभावीपणे केलेला आहे‌. यातून दलित उत्थान आणि जातीव्यवस्थेविरोधातील बंडखोरीमागील आंबेडकरांनी दिलेली प्रेरणा क्षणोक्षणी अधोरेखित होत राहते.

शैलेश नरवडे यांच्या 'जयंती' (2021) सिनेमाचा नायक आंबेडकरांचं लिखाण आणि कार्य वाचून प्रभावित होतो आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा धीरोदात्तपणे प्रतिकार करतो. आंबेडकरांचं अशा प्रेरणादायी पद्धतीने केलं जाणारं चित्रण ही भारतीय सिनेमात नव्याने घडत असलेली प्रक्रिया आहे.

आंबेडकरांनी दिलेली नैतिक मूल्यांची शिकवण आणि बुद्धीवादाला प्रमाण मानून दलित अस्मिता जागवण्याचा प्रयत्न या चित्रपटांमधून होताना दिसतो.

जयंती चित्रपटाचे पोस्टर आणि शैलेश नरवडे

फोटो स्रोत, Facebook/Shailesh Narwade

फोटो कॅप्शन, जयंती चित्रपटाचे पोस्टर आणि शैलेश नरवडे

सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता सूर्या यांचा 'जय भीम' (2021) हा चित्रपट देखील जातीय अत्याचारावर भेदक भाष्य करून जातो. एका आदिवासी जोडप्यावर खोटे आरोप आणि खटले दाखल करून पोलीस व्यवस्था त्यांना जाळ्यात अडकवते.

पोलीस बळाचा वापर करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. पण संवैधानिक मूल्य आणि आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या एका वकिलाच्या मदतीने न्यायालयीन लढाई लढून हे जोडपं न्याय मिळवण्यात यशस्वी होतं, असं या चित्रपटाचं साधारण कथानक आहे.

'जय भीम' चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, @2D_ENTPVTLTD

फोटो कॅप्शन, 'जय भीम' चित्रपटाचे पोस्टर
Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातील घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

गरिबी, पोलीस अत्याचार आणि वंचित समूहांचं केलं जाणारं व्यवस्थात्मक गुन्हेगारीकरण या संवेदनशील विषयांवर हा सिनेमा आंबेडकरी विचारधारेच्या चष्म्यातून भाष्य करतो. खालच्या जातीतील लोकांच्या रोजच्या आयुष्यातील संघर्ष या चित्रपटात दाखवला गेलाय. मात्र, या जातीयवादी सामाजिक रचनेतही शोषित-वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटी संविधानच कामी येतं.

या व्यवस्थेतील अन्याय अत्याचाराविरोधात दाद मागण्याची तरतूदही इथल्या संविधानातच आहे. त्यामुळे संविधानाच आपली खरी ताकद आहे, हा आशावाद सिनेमा जागवतो.

मेरी सेल्वराजनं देखील 'मामनान' (2023) या आपल्या सिनेमातील दलित नायक हतबल आणि कमजोर न दाखवता जातीव्यवस्थेविरोधात विद्रोह करून सामाजिक व राजकीय बदल घडवून आणण्याची धमक बाळगणारा दाखवला आहे.

जातीव्यवस्थेनं बहाल केलेलं खालचं स्थान नाकारून जातीची उतरंड मोडत नव्याने स्वतःची ओळख निर्माण करण्याचा हा विचार आंबेडकरांच्याच राजकीय चळवळीतून आलेला आहे.

जात आणि दलितांच्या प्रश्नांवर 2023 साली 'गुठली' आणि 'कस्तुरी' हे आणखी दोन चांगले चित्रपट प्रदर्शित झाले. वाल्मिकी या शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीतील एका लहान मुलाची गोष्ट 'गुठली' चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

या लहान मुलाला त्याच्या जातीवरून भेदभाव आणि दुराचाराचा सामना करावा लागतो. शिक्षण घेण्याचं त्याचं स्वप्न असतं, पण जातीमुळे त्याला शाळेत दाखला मिळण्यापासून अडवलं जातं. शाळा शिकण्यासाठीचा या लहान मुलाने केलेला संघर्ष या चित्रपटात रेखाटलेला आहे.

कस्तुरी चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, Instagram/nagraj_manjule/Insight Films

फोटो कॅप्शन, कस्तुरी चित्रपटाचे पोस्टर

गरिबी, भेदभाव आणि वेठबिगारी या चक्रातून दलितांना बाहेर पडून सन्मानानं जगायचं असेल, तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असं दलित उत्थानाचं तत्वज्ञान आंबेडकरांनी मांडलं होतं. आंबेडकरांचा हाच सल्ला प्रमाण मानून हा लहान मुलगा शाळेत दाखला मिळवण्यासाठी किती खटाटोप करतो, हे या चित्रपटात दाखवलं गेलंय.

शिक्षण हाच दलितांना सामाजिक आणि आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाणारा एकमेव रस्ता आहे, ही आंबेडकरांनी दिलेली शिकवणच या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.

तर 'कस्तुरी' हा चित्रपट जातीव्यवस्थेनं बरबटलेल्या आपल्या समाजात दलितांना कोणत्या सामाजिक आणि मानसिक आघातांमधून जावं लागत, याचं हृदयद्रावक चित्रण करतो. एक लहान दलित मुलगा आणि त्याचं कुटुंब जातीव्यवस्थेनं त्यांना आखून दिलेलं मैला सफाईचं काम करत असतात.

एकतर जातीव्यवस्थेनं जन्मजात मर्जीशिवाय त्यांना हे काम सोपवलेलं आहे. तरीही हे काम करत असल्यामुळे त्यांची कायम प्रतारणा केली जाते.

चित्रपटाचा नायक असलेल्या या लहान मुलाला अर्थातच या अवहेलनेमुळे या कामाबद्दल राग असतो. सफाईकाम केल्यामुळे आपल्या अंगावर बसलेली दुर्गंधी घालवण्यासाठी त्याचा कस्तुरीचा शोध सुरू होतो. त्या कस्तुरीचा सुगंध आपल्या अंगाला चिकटलेली दुर्गंधी घालवेल, अशी आशा त्याला असते.

दिग्दर्शकाने ही दुर्गंधी म्हणजे दलितांवर जातीव्यवस्थेनं हीन दर्जाचा मारलेला शिक्का आहे आणि कस्तुरीने ही दुर्गंधी म्हणजेच दलितांची अवहेलना संपुष्टात येईल, असं कलात्मक रूपक वापरून कथा रचली आहे. इथे कस्तुरी म्हणजे जातीअंतांच्या उद्देशासाठी वापरलं गेलेलं रूपक आहे.

हिंदू समाजातील जात नावाच्या सामाजिक रोगाचं जे निदान बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं त्याचं उत्कृष्ट विवरण हे दोन्ही चित्रपट तरलपणे करतात. जातीव्यवस्थेची चिरफाड करून त्याविरोधात विद्रोह करण्याची प्रेरणा या दोन्ही चित्रपटांमधून खालच्या जातींमधील लोकांमध्ये पेरण्याचं काम हे चित्रपट करतात.

आपल्या समाजातील सगळ्या दु:खाचं मूळ कारण ही जातीव्यवस्थाच आहे. त्यामुळे समाज सुधारायचा असेल तर ही जातीव्यवस्था उखडून फेकायला हवी, हा बाबासाहेबांचा क्रांतीकारी संदेश या दोन्ही चित्रपटांचा मुख्य आशय आहे.

छोट्या पडद्यावर आंबेडकरांचं आगमन

ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या आगमनामुळे छोट्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा परिघ विस्तारला. पारंपरिक चौकट मोडून गोष्टी सांगण्याच्या नव्या शक्यता आजमावणं ओटीटीमुळे शक्य झालं. त्यात टीव्हीप्रमाणे सेन्सॉरशिपचंही बंधन नसल्यानं या प्रयोगशीलतेला आणखी वाव मिळाला.

अर्थात सेन्सॉरशिप नसल्यामुळे अगदी सुमार आणि अतिरंजित मजकूरही तितक्यात प्रमाणात बनवला जातो हे खरं असलं, तरी अभिव्यक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याची ही नवी योजना अभिनव प्रयोग करायलाही तितकीच मोकळीक देणारी ठरली‌.

लोकांचे खऱ्या आयुष्यातील प्रश्न आणि समस्यांना या छोट्या पडद्यावरील नवीन कथानकांमध्ये जागा मिळाली. यात मग दलितांच्या आयुष्याला सुद्धा प्रतिनिधित्व मिळू लागलं. त्यामुळे मागच्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दलितांचं आयुष्य आणि आंबेडकरांचंही अस्तित्व जोरकसपणे मांडलं जाताना दिसतंय.

आधी फक्त उच्चवर्णीयांचीच आवड आणि हितसंबंध जपणारा उथळ व एकांगी मजकूर टीव्हीवर दाखवला जायचा. आता दलित बहुजन प्रेक्षकांना आपल्या वाटतील अशा कथा ओटीटीच्या माध्यमातून मांडल्या जात आहेत. दलित बहुजनांचं आयुष्य, त्यांचा इतिहास आणि संस्कृती छोट्या पडद्यावरून दाखवली जात आहे.

आज ओटीटीवर आंबेडकरांचा जीवनपट मांडणाऱ्या तीन वेगवेगळ्या वेब सीरिज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. झी 5 वरील 'एक महानायक-डॉक्टर आंबेडकर' (2020) या वेब सीरिजचे तब्बल 27 सीझन्स आणि 250 एपिसोड्स आहेत.

आंबेडकरांच्या आयुष्यावरील ही सर्वांत दीर्घ सिरीज आहे. या मालिकेत निर्मात्यांनी कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाने अर्थातच काही गोष्टी अतिरंजित करून दाखवल्या आहेत. पण आंबेडकरांच्या आयुष्यावर इतकी दीर्घ मालिका मुख्यधारेतील वेब सिरीज रूपात येण्याचं महत्त्व यामुळे कमी होत नाही.

झी वरील सीरिज

फोटो स्रोत, zee5

झी 5 सारख्या मोठ्या कंपनीने बनवलेली असल्यानं या मालिकेचं निर्मिती मूल्यही दर्जेदार झालेलं आहे. म्हणूनच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. डिस्ने + हॉटस्टारवरील एका महामानवाची 'गौरवगाथा' (2020) ही मालिका देखील आंबेडकरांच्या आयुष्यावर आधारलेली आहे.

या मालिकेत आंबेडकराच्या बालपणापासून त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंतचा जीवनप्रवास विस्ताराने मांडला आहे. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील ‘रिमेम्बरिंग आंबेडकर’ या नावाने एक तासाचा खास संगीतावर आधारित कार्यक्रम आंबेडकरांचं कर्तृत्व वेगळ्या शैलीत सादर करतो.

ॲमेझॉन प्राईमवरील 'मेड इन हेवन' या वेब सिरीजमधील ‘द हार्ट स्किपड ए बिट’ नावाच्या एपिसोडमध्ये आंबेडकरांचं तत्वज्ञान प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. निरज घायवानने हिचं लिखाण आणि दिग्दर्शन केलेलं आहे. या कथानकातील पल्लवी मानके हे प्रमुख दलित पात्र अभिनेत्री राधिका आपटे हिने साकारलं आहे.

दलित जातीतून येणारी पल्लवी मानके आता परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक असते. तिला स्वत:च्या दलित असण्याची लाज नाही, तर अभिमान वाटत असतो. विद्रोही स्वभावाची पल्लवी ठामपणे स्वतःची भूमिका वेळोवेळी मांडत असते.

एका संवेदनशील आणि सुधारणावादी भारतीय-अमेरिकन वंशाच्या वकिलासोबत तिचं लग्न जमतं. तिचा होणारा पती हा उच्चवर्णीय असतो. लग्नात उच्चवर्णीय हिंदूंच्या विधीबरोबरच बौद्ध विधी सुद्धा साजरा करायचा आग्रह ती धरते. पण त्यात तिला अनेक अडचणी येतात.

मेड इन हेव्हन वेबसीरिजमधील एक स्क्रिनशॉट

फोटो स्रोत, Youtube/PrimeVideoIndia

फोटो कॅप्शन, मेड इन हेव्हन वेबसीरिजमधील एक दृश्य

आपल्या लग्नात आपली बौद्ध ही ओळख दाखवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्यानं ती अस्वस्थ होते. पण शेवटी नेटाने टिच्चून बौद्ध विधिवत लग्न करून दाखवते. या लग्नसोहळ्यात बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो मध्यभागी लावलेला दाखवला गेलाय.

ही फ्रेम फार बोलकी आहे. उच्चवर्णीय ब्राम्हणी सौंदर्यशास्त्राला छेद देत दलित अस्मिता जागवण्याचा बाबासाहेबांचा संदेश या एका प्रसंगातून दिग्दर्शकाने नितांतसुंदर पद्धतीने पेरला आहे.

'सिरीयस मेन' (नेटफ्लिक्स), 'महाराणी' (सोनी लिव्ह), 'पाताल लोक' (ॲमेझॉन प्राईम), 'दहाड' (ॲमेझॉन प्राईम), 'आश्रम' (एम एक्स प्लेअर) या वेब सिरीज आणि 'कठल' (नेटफ्लिक्स) आणि 'परिक्षा' (झी 5) या चित्रपटांचं कथासूत्र जातभेदावरच आधारलेलं आहे‌.

दलित पात्र या कथांमधील प्रमुख सूत्रधार आहेत. ही दलित पात्र त्यांची सामाजिक ओळख ठामपणाने मांडत दलित अस्मितेचं जोरकस प्रदर्शन करतात. जातीव्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचं काम या कलाकृतींमधून कलात्मक पद्धतीनं केलं गेलंय.

दलित प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या माहितीपटांचा उदय

चित्रपट, वेब सिरीजद्वारे काल्पनिक गोष्टींबरोबरच खऱ्या आयुष्यातील दलितांच्या प्रेरणादायी कथा माहितीपटाच्या रूपात देखील मांडल्या जात आहेत. 2017 साली नेटफ्लिक्सने 'डॉटर्स ऑफ डेस्टिनी' हा चार भागातला माहितीपट प्रदर्शित केला.

शाळेत जाणाऱ्या दलित मुलींना त्यांच्या जातीमुळे करावा लागत असलेला संघर्ष या माहितीपटातून दाखवण्यात आला आहे. ग्रामीण भारतातील दलित मुलींनी जातीव्यवस्थेच्या जाचाविरोधात बंड पुकारून शिक्षणासाठी दिलेल्या लढ्याची ही खरी गोष्ट आहे.

असे माहितीपट भारतातील सामाजिक स्थिती, जातीय अत्याचार, दलितांसोबत केला जाणार भेदभाव व हिंसा आणि त्याविरोधात दलितांनी दिलेल्या लढ्याची प्रेरणादायी उदाहरणं समोर आणतात.

स्टॅलिन के यांनी 2007 साली बनवलेला 'इंडिया अनटचड' हा भारतातील दलितांची स्थिती खऱ्या अर्थानं पहिल्यांदा समोर आणणारा माहितीपट आहे. भारतातील लोकसंख्येच्या मोठा भाग रोज कुठल्या त्रासातून जात आहे, याचं वास्तववादी चित्रण हा माहितीपट दाखवतो.

आनंद पटवर्धन यांनी 2011 साली 'जय भीम कॉम्रेड' हा माहितीपट बनवला. महाराष्ट्रातील दलित पँथर संघटनेचा उदय, दलित अस्मिता धारदार करून जातीव्यवस्थेविरोधातील लढ्यामधील त्याचं योगदान या 3 तासांच्या माहितीपटात विस्तारानं मांडण्यात आलेलं आहे.

दलित पँथर ही संघटना भारताच्या आंबेडकरी चळवळीतील एक मैलाचा दगड आहे. जाती व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यासाठी एक नवा आत्मविश्वास आणि सौंदर्यशास्त्र दलित पँथरनं विकसित केलं.

'नाऊ ॲन्ड देन' चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, Facebook/Jyoti.Nisha.10

फोटो कॅप्शन, 'नाऊ ॲन्ड देन' चित्रपटाचे पोस्टर

दलित बहुजन सामाजिक पार्श्वभूमीतून येणारे नव्या दमाचे तरुण कलाकार दलितांचे प्रश्न आणि आंबेडकरांचे विचार ताकदीने चित्रपट, मालिका आणि माहितीपटांमधून मांडत आहेत. ज्योती निशा या तरूणीने 'नाऊ ॲन्ड देन' (2023) या माहितीपटातून भारतातील दलितांची आजची परिस्थिती दाखवली आहे.

निशा स्वतःची ओळख एक बहुजन स्त्रीवादी फिल्ममेकर अशी सांगते. जातीव्यवस्थेनं पिचलेल्या दलितांचा आणि पितृसत्ताक व्यवस्थेनं दबलेल्या महिलांच्या परिस्थितीवर बहुजन स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून भाष्य करण्याचा प्रयत्न तिने या माहितीपटामधून केला आहे.

सोमनाथ वाघमारे या तरुण फिल्ममेकरनं आपल्या 'चैत्यभूमी' (2023) या माहितीपटातून मुंबईमधील आंबेडकरांची समाधी ही ऐतिहासिक वास्तू आजही दलितांसाठी प्रेरणा म्हणून अशी दिमाखात उभी आहे, हे दाखवलं आहे. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाला लाखो दलित लोक आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर जमतात.

या निमित्ताने आंबेडकरांचे विचार जागवले जातात. 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर आंबेडकरी विचारांचं साहित्य आणि पुस्तकांची लाखोंच्या घरात होणारी विक्री याचं बोलकं उदाहरण आहे‌. हा दिवस आणि या वास्तूचं दलितांच्या आयुष्यातील महत्त्व या माहितीपटातून अधोरेखित होतं.

चैत्यभूमी माहितीपटाचे पोस्टर आणि सोमनाथ वाघमारे

फोटो स्रोत, Facebook/Somnath.Waghmare.52

फोटो कॅप्शन, चैत्यभूमी माहितीपटाचे पोस्टर आणि सोमनाथ वाघमारे

माध्यम संस्कृतीतील दलित-बहुजन अभिव्यक्ती

अनेक वर्ष अनुल्लेखाने मारलं गेल्यानंतर आता कुठे आंबेडकर आणि दलितांना चित्रपट, मालिका आणि ओटीटीवरील वेब सिरीजमध्ये प्रतिनिधित्व मिळायला सुरुवात झालेली आहे. यामुळे दलित-बहुजन संस्कृतीला मुख्यधारेतील सांस्कृतिक विश्वात तिचं योग्य ते स्थान मिळू लागलं आहे.

या वर्षी आलेला जॉन अब्राहमचा 'वेदा' हा चित्रपट अस्पृश्यता, जातीय मानसिकता आणि त्यावर मात करण्यासाठी दलित करत असलेल्या संघर्षावर आधारलेला आहे.

अर्थात या चित्रपटाच्या स्वतःच्या काही मर्यादा असल्या तरी दलित प्रश्न हा बॉलीवूडमधील एका व्यावसायिक चित्रपटाचं मुख्य कथानक म्हणून येतो, ही गोष्ट याच स्वागतार्ह बदलाचं उदाहरण आहे. अन्यथा दलितांच्या आयुष्यावर मुख्यधारेतील बॉलीवूड सिनेमा बनू शकतो, याची कल्पनाही काही वर्षांपूर्वीपर्यंत करणं शक्य नव्हतं.

चित्रपटांना अधिकाधिक सर्वसमावेशक आणि सामाजिक भान जपणारं माध्यम बनवण्यासाठी मुख्यधारेतून हे विषय हाताळले जाणं गरजेचं आहे. दलित प्रश्नांवरही व्यावसायिक बॉलिवूड चित्रपट बनवला जाऊ शकतो, असा पायंडा यानिमित्ताने पडायला सुरुवात झाली आहे.

वेदा चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, X/Zee5India

फोटो कॅप्शन, वेदा चित्रपटाचे पोस्टर

अजूनही दलित सिनेमा हा म्हणावा तितका मोठा झालेला नाही. पण युरोपातील चित्रपट उद्योगाप्रमाणे सर्वसमावेशक आणि सामाजिक भान जपण्याची समज हळूहळू भारतात विकसित होत आहे‌.

फक्त मनोरंजनच नव्हे तर लोकांमध्ये सामाजिक मुद्यांप्रती जागरूकता निर्माण करणं हा देखील चित्रपटांचा उद्देश असला पाहिजे. आंबेडकर हे फक्त भारतातील दलितांचेच नव्हे, तर जगभरातील शोषित वंचित समूहाचे प्रेरणास्थान आहेत.

सामाजिक विषमता आणि अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची शिकवण आंबेडकरांनी जगाला दिली. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेनं प्रभावीत झालेले लोक बाहेरच्या देशातही आढळून येतात.

इझाबेल विल्करसन यांच्या 'कास्ट' या पुस्तकावर आधारित 'ओरिजन' (2023) हा चित्रपट प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक एव्हा डूवरने यांनी बनवला आहे. या चित्रपटातून आंबेडकर हे फक्त भारतातील दलितांचेच नव्हे, अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि जगभरातील शोषितांची प्रेरणा असल्याचं दाखवलं गेलंय.

आंबेडकरांनी मांडलेलं तत्वज्ञान जगभरातील प्रत्येक विषमतावादी सामाजिक व्यवस्थेत पिचलेल्या वर्गाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी कसं उपयुक्त आहे, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलंय. अभिनेता गौरव पथानिया यांनी या चित्रपटात आंबेडकरांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

अभिनेता गौरव पथानिया

फोटो स्रोत, Facebook/GauravJPathania

फोटो कॅप्शन, अभिनेता गौरव पथानिया

चित्रपट या माध्यमात पारंपरिकरित्या उच्चवर्णीयांचीच मक्तेदारी राहिलेली आहे. त्यामुळे या चित्रपटांमधून उच्चवर्णीयांचे हितसंबंध जपणारा मजकूर आणि आशयच मुख्यत: प्रसारित केला जातो. बहुजनांना कायम उच्चवर्णीयांचीच आवड निवड जपणारा हा आशय फक्त प्रेक्षक म्हणून पाहावा लागला आहे.

सांस्कृतिक पटलावरील चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. चित्रपट क्षेत्रावरील उच्चवर्णीयांची ही मक्तेदारी मोडून काढत दलित-बहुजन अभिव्यक्तीला वाव मिळण्याची गरज आहे.

जातीव्यवस्थेविरोधातील लढा आणखी मजबूत करण्यासाठी चित्रपट या माध्यमाचा देखील तितकाच प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. तो करायचा असेल, तर चित्रपट क्षेत्रातील दलित बहुजनांचं प्रतिनिधित्व आणि त्या अनुषंगानं चित्रपटांचा आशयही बदलाला पाहिजे. उच्चवर्णीय अभिव्यक्तीची मक्तेदारी मोडून सिनेमातील दलित सौंदर्यशास्त्र विकसित झालं पाहिजे.

आंबेडकरांचे विचार जनमानसात पेरण्यासाठी चित्रपटदेखील तितकंच सशक्त माध्यम म्हणून कामी येऊ शकतं. दलित सिनेमाच्या निमित्तानं याची सुरुवात तरी झालेली आहे.

प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन न करता सामाजिक बदलाला हातभार लावण्याची सिनेमा या माध्यमाची ताकद ओळखून नवनवे प्रयोग होण्याची गरज आहे. तेव्हा कुठे सिनेमा हे माध्यम खऱ्या अर्थानं लोकांचं होईल.

(लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत. लेखातील मतं वैयक्तिक आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)