वाल्मिक कराड : परळीचा 'अण्णा' ते मकोकाचा आरोपी, संपूर्ण प्रवास एका क्लिकवर
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर 14 जानेवारी 2025 रोजी मकोका लावण्यात आला असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे.
"ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड.." राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं हे वाक्य सध्या व्हायरल होत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड आणि महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील जवळीक पंकजा मुंडेंच्या या विधानावरून स्पष्ट होते.
भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांच्याच पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अशा अनेक नेत्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कधी 'आका' म्हणून तर कधी थेट नाव घेऊन वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केली होती.
9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर दोन दिवसांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.
मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अवादा एनर्जी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली होती.
त्याआधी 6 डिसेंबर रोजी याच अवादा एनर्जीच्या आवारात सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्यांमध्ये वाद झाला होता.
याच वादातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला आहे. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील कार्यालयात आत्मसर्पण केलं.
त्याआधी त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून त्यांच्यावर राजकीय हेतूनं आरोप केले जात असल्याचं म्हटलं होतं.
या आत्मसर्पणानंतर विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी हे पोलीस आणि गृहविभागाचं अपयश असल्याची टीका केली. तर काहींनी वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पण करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला.
सोशल मीडियावरच्या असंख्य व्हीडिओचे थंबनेल, वर्तमानपत्रांचे मथळे, राजकीय नेत्यांच्या बाइट्स या सगळ्यांमध्ये सध्या वाल्मिक कराड या नावाची चर्चा सुरू आहे.
परळीत होणाऱ्या राजकीय सभांमध्ये फारसे समोर न येणारे वाल्मिक कराड नेमके कोण आहेत? संपूर्ण राज्याच्या पोलीस विभागाला गुंगारा देण्याचं कसब त्यांच्याकडे कुठून आलं?
धनंजय मुंडे, रोहित पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते, अभिनेत्यांसोबत फोटो असणारे वाल्मिक कराड यांच्याकडे नेमकी कसली जादू आहे?
परळी, बर्दापूर, अंबेजोगाई शहर आणि केज पोलीस ठाण्यात वाल्किम कराड यांच्याविरोधात 14 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अवैध पद्धतीनं शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, जमीन बळकावण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
हे गुन्हे दाखल असूनही त्यांचे बॉडीगार्ड म्हणून पोलीस विभागातील कर्मचारी काम करतात. असे हे वाल्मिक कराड नेमके कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण आहेत वाल्मिक कराड?
वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत.
धनंजय मुंडेंनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांना सोडून स्वतंत्रपणे राजकारणाची सुरुवात केल्यापासून वाल्मिक कराड हे त्यांच्यासोबत आहेत.
वाल्मिक कराड यांच्याबाबत बोलताना पत्रकार सुकेशनी नाईकवाडे म्हणाल्या, "परळी तालुक्यात धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे असं समीकरण असलं तरी वाल्मिक कराड यांची सुरुवात मात्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करूनच झाली आहे."
परळी वैजनाथ शहरापासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या पांगरी या गावात 29 जानेवारी 1969 रोजी वाल्मिक कराड यांचा जन्म झाला.
घरची परिस्थिती बेताची असल्यानं अगदी कमी वयातच त्यांनी पैसे कमवायला सुरुवात केली. ज्या गावात वाल्मिक कराड यांचा जन्म झालाय आता तेच गाव गोपीनाथगड म्हणूनही ओळखलं जातं.
प्राथमिक शिक्षण पांगरी आणि गाढे पिंपळगाव या गावांमध्ये घेतल्यानंतर, वाल्मिक कराड महाविद्यालयात शिकायला परळीला आले. परळीत आल्यानंतर ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले.
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा तो काळ होता. त्यावेळी परळीच्या परमार कॉलनीत गोपीनाथ मुंडे भाड्याच्या घरात राहायचे.
गोपीनाथ मुंडेंचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराड यांना मुंडेंच्या घरात कामासाठी आणले. तेव्हापासून वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंच्या घरातील सगळी कामं करू लागले.
जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक ठरली टर्निंग पॉईंट
वाल्मिक कराड यांच्याबाबत सध्या परळीमध्ये फारसं बोललं जात नाही. अनेक पत्रकार नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांची माहिती सांगत आहेत. एवढंच काय सीआयडीकडे आत्मसर्पण केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी देखील त्यांच्याबाबत बोलताना 'नो कमेंट्स' असं म्हटलं आहे.
मात्र 1993 -1995 दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा किस्सा मात्र पत्रकार आवर्जून सांगतात.
दैनिक सकाळचे वरिष्ठ पत्रकार दत्ता देशमुख सांगतात, "त्यावर्षीच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टी. पी. मुंडे यांच्या पॅनलचा थेट सामना होता. निवडणुकीच्या निकालात गोपीनाथ मुंडे यांचे 7 उमेदवार निवडून आले, तर टी. पी, मुंडेंचे 23 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे अध्यक्ष टी. पी. मुंडेंचा होणार हे स्पष्ट होते. जिंकलेल्या सदस्यांतून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ हाणामाऱ्या सुरू झाल्या. तेव्हा गोपीनाथरावांच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या मांडीत तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या पिस्तूलातून निघालेली गोळी घुसली."
या घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्यावर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास बसला आणि ते अधिकाधिक मुंडे कुटुंबियांच्या जवळ गेले.
पंडितअण्णा मुंडे यांच्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश
गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करण्यापासून सुरुवात झालेले वाल्मिक कराड यांनी हळूहळू स्वतःचा जम बसवला. दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडितअण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली.
पुढे 2001 साली परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध असतानाही पंडितअण्णा मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना तिकीट दिलं. त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.
त्यानंतर वाल्मिक कराड नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले. काहीकाळ परळीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं.
एकीकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक वाढत गेली, तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध दुरावत गेले.
एका बाजूला राजकारण दुसऱ्या बाजूला 'अर्थ'कारण
शाळेत असताना वाल्मिक कराड परळीतून व्हीसीआर भाड्याने आणून नाथरा, इंजेगांव आदी गावांच्या जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवत.
यात्रेत सिनेमा दाखवणारे वाल्मिक कराड आज जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड, आणि काही खासगी कंपन्यांमध्ये संचालक आहेत. या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत.
1988-89 मध्ये परळीच्याच शिवाजी चौकात वाल्मिक कराड यांनी भगवानबाबा गणेश मंडळ स्थापन केलं. याचकाळात शहरात असणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांची कंत्राटं देखील त्यांना मिळायला लागली.
वाल्मिक कराड यांच्याबाबत बोलताना सुकेशनी नाईकवाडे सांगतात, "गोपीनाथ मुंडे यांच्या सभांचे नियोजन वाल्मिक कराड यांच्याकडं असायचं. एखाद्या इव्हेंट मॅनेजरला लाजवेल असं नियोजन वाल्मिक कराड करायचे. भगवानबाबा गणेश मंडळाच्या माध्यमातून ते सुरुवातीला क्रिकेट स्पर्धा आणि नंतर सामुदायिक विवाह सोहळा घेऊ लागले."
परळी औष्णिक विद्युत प्रकल्पात येणारा कोळसा जवळच्या रेल्वे स्थानकावरून आणावा लागायचा.
या कोळसा वाहतुकीची कंत्राटं देखील दिली जायची.
याबाबत बोलताना बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी एका मुलाखतीत सांगितलं, "रेल्वे स्टेशनपासून परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा आणण्याची कंत्राटं निघायची. कोळशाची वाहतूक करण्याचा मोठा धंदा होता. तिथे बऱ्याचदा वाहतूक केलेल्या मालापेक्षा जास्त मालाची नोंद करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली जायची. त्यातूनच एका अधिकाऱ्यानं माझ्याकडे बंदुकीचा परवाना मागितला होता."
याच औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा अवैध व्यापार केल्याचे आरोप आमदार सुरेश धस यांनी केले आहेत.
परळी आणि परिसरात हजारो वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यांना लागणारी राख औष्णिक विद्युत केंद्रातून येते. ही राख उचलण्याचं काम देखील वेगवेगळ्या लोकांकडून याभागात करण्यात येतं.
सुरेश धस यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा कुठलाही हिशोब नसतो. परळीतून रोज सुमारे 300 टिप्पर (मोठ्या ट्रक) भरून राख वाहून नेली जाते. यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या प्रत्येक ट्रकमागे काही 'ठराविक' लोकांना पैसे दिले जातात."
उत्तम इव्हेंट मॅनेजर
सुरेश धस यांनी या प्रकरणात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत परळीच्या 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा उल्लेख केला होता. त्या वक्तव्यात त्यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे नंतर सुरेश धस यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
मात्र परळीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं कौतुक स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेंसह अनेक राजकारण्यांनी केलं आहे.
दैनिक बीडसंकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया यांनी मागच्या 30 वर्षांपासून परळीतील राजकीय घटनांचं वार्तांकन केलं आहे. वाल्मिक कराड यांच्याबाबत बोलताना ते सांगतात, "स्वतः पालकमंत्र्यांच्या अतिशय जवळचे असल्यामुळे वाल्मिक कराड यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना वाल्मिक कराड त्यांच्या स्वीय सहाय्यकाप्रमाणेच काम करायचे."
वाल्मिक कराड यांच्या कामांबाबत बोलताना कांकरिया म्हणाले, "अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातील 'संदेश यात्रेची' धुरा धनंजय मुंडेंकडे होती. तेव्हा त्याचे नियोजन वाल्मिक कराड यांनीच केले.
परळी वैजनाथ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत शरद पवार म्हणाले, 'गेल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत मी इतकी नियोजनबद्ध अफाट सभा बघितली नाही. यासाठी धनंजय मुंडे अभिनंदनास पात्र आहेत.'
दरम्यान, एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील परळीत आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे."
एवढंच काय तर धनंजय मुंडे भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा देखील वाल्मिक कराड यांनीच स्थापन केली होती.
याबाबत बोलताना दत्ता देशमुख सांगतात, "सुरुवातीला परळी मतदारसंघात काम करणाऱ्या वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाभर ओळख निर्माण केली. तत्कालीन नगराध्यक्ष सोमनाथ हालगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून ते परळीचे नगराध्यक्ष देखील झाले होते."
"वाल्मिक कराड यांनी जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष, परळी नगरपालिकेचे गटनेते अशी पदंही भुषवली आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, या प्रकरणात विनाकारण राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले जात आहेत ते चुकीचं आहे.
यामध्ये राजकारण आणून विषय भरकटवला जातो आहे. मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे सीआयडीने मला चौकशीसाठी बोलावलं होतं. वाल्मिक कराड माजी नगराध्यक्ष होते आणि राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. ते धनंजय मुंडे यांचे पीआरओ होते.
त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही त्यांना भेटायचो. या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांना आम्ही पक्षातून तात्काळ काढून टाकलं आहे. वाल्मिक कराड हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते. मी 2021 ला पक्षाचा अध्यक्ष झाल्यापासून त्यांना ओळखतो हे मी पोलिसांना सांगितलं आहे."
थोडक्यात काय तर गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करून सुरू झालेला वाल्मिक कराड यांचा प्रवास आता, एका खून प्रकरणात राज्यभर चर्चेत असलेल्या नावापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)