भारतातले कॅथलिक पाद्री ब्राझीलमध्ये कसे रुळले? वाचा
- Author, व्हिक्टर टावरेस
- Role, बीबीसी न्यूज
ब्राझील आणि अॅमेझॉन म्हटलं की, तुमच्या डोळ्यासमोर नक्की काय येतं? अतिशय घनदाट असं सदाहरित जंगल, नदीचं प्रचंड खोरं आणि तिथले वन्यजीव!
अर्थातच, त्यात अॅनाकोंडा सुद्धा आलाच. मात्र, या पलीकडे भारतीयांना ब्राझीलचा फारसा परिचय नसतो. मात्र, भारतातून ब्राझीलमध्ये गेलेले कॅथलिक पाद्री या निसर्गसमृद्ध विशाल देशात थक्क करणारं काम करत आहेत.
ब्राझीलसह लॅटिन अमेरिकेत कधीकाळी युरोपियन पाद्रींनी धर्मप्रचाराचं काम केलं होतं. मात्र, युरोपातून पाद्री येईनासे झाल्यावर भारतीय पाद्री पुढे सरसावले असून ते ब्राझील आणि अॅमेझॉनच्या खोऱ्यात अतिशय चिकाटीनं काम करत आहेत. ब्राझीलमध्ये नेमकं काय घडतं आहे त्याचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
अर्सेलिन एसॅक हे 30 वर्षांचे भारतीय पाद्री मंगळवार ते रविवार चर्चमध्ये मास म्हणजे प्रार्थनेसाठी जातात. ते अॅमेझॉनच्या सदाहरित जंगलाला 'देवाचं राज्य' म्हणतात. दररोज ते या देवाच्या राज्याला भेट देण्यासाठी जातात.
साओ पेड्रो चर्चच्या शेजारीच अर्सेलिन एसॅक यांचं दोन मजली घर आहे. ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या खोऱ्यातील मॅनाकिरी या शहराच्या मध्यभागी असलेली ही सर्वात भव्य इमारत आहे. घरातून बाहेर पडून ते पायी तीन किलोमीटरचा फेरफटका मारतात.
निसर्गाच्या सान्निध्यात, 'मानव जातीपेक्षा महान' अशा गोष्टीत स्वत:ला हरवून टाकण्यासाठी किंवा विसर्जित करण्यासाठी हा फेरफटका पुरेसा असतो.
निसर्गाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना अर्सेलिन म्हणतात, "इथे, तुम्ही निसर्गाशी अधिक जोडले जाता, अधिक चांगला सुसंवाद साधता, तुम्ही देवाच्या जवळ असता."
त्यांची पार्श्वभूमी मात्र काही जंगलातील नाही. ते मूळचे तामिळनाडूतील आहेत. महत्त्वाचं म्हणजे तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं आणि सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य आहे.
अर्सेलिन 2016 सालापासून ब्राझीलमध्ये आहेत. एका वर्षासाठी पॅरिशचे (चर्चच्या पाद्रीच्या अधिकाराखाली येणारा प्रदेश आणि ख्रिश्चन समुदाय) नेतृत्व करत असताना त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला, तो अलीकडच्या काही वर्षांमध्ये डझनावारी भारतीय कॅथलिकांनी अंमलात आणला आहे.
हा मार्ग म्हणजे ब्राझीलमध्ये मिशनरी म्हणजे पाद्री बनून येणं, पोर्तुगीज भाषा सखोलपणे शिकणं आणि त्यानंतर अॅमेझॉनच्या दुर्गम भागात चर्चचं काम करणं. याच भागात राहण्यास अनेकजण पसंती देतात.
मात्र, जंगलात खोलवर राहण्याचा निर्णय फक्त निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठीच घेतला जातो. ब्राझीलमधील सर्वात मोठ्या जैवविविधतेनं नटलेल्या जंगलाच्या मध्यभागी, कॅथलिक चर्चना पाद्री शोधण्यासाठी आणि त्यांना पाठवण्यासाठी सर्वाधिक संघर्ष करावा लागला आहे. ब्राझीलच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 49 टक्के भूप्रदेशावर अॅमेझॉनचं जंगल पसरलेलं आहे, अशी माहिती भारतीय आणि ब्राझीलच्या चर्चशी संबंधित पाद्रींच्या गटानं बीबीसीला दिली.
या भागात असे समुदाय आहेत जे तिथे चर्च असून देखील संपूर्ण वर्षभरात एकदाही चर्चमध्ये मास साठी किंवा चर्चमधील प्रार्थनेसाठी जात नाहीत.
"इथे पाद्रींचा तुटवडा आहे आणि प्रचंड काम करावं लागणार आहे," असं अर्सेलिन म्हणतात. अर्सेलिन, बाला सुरेश या आणखी एका भारतीय पाद्रीबरोबर पॅरिशचं (चर्चच्या पाद्रीच्या अधिकाराखाली येणारा प्रदेश आणि ख्रिश्चन समुदाय) व्यवस्थापन सांभाळतात.
बहुतांश भारतीय गेल्या 15 वर्षांमध्ये ब्राझिलमध्ये आले आहेत. ते भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये सक्रिय असलेल्या ख्रिस्ती समुदाय किंवा मिशनरींच्या माध्यमातून आले आहेत. यात दोन मिशनरी प्रमुख आहेत. त्या म्हणजे, मिशनरीज ऑफ मेरी इमॅक्युलेट (MMI)आणि डिव्हाईन वर्ड मिशनरीज.
आज भारतीय पाद्री हुमैटा, नोवो अरिपुआना, इटाकोटिआरा, मनॉस आणि बोर्बा सारख्या पोर्तगीज शहरांमध्ये चर्चमध्ये ख्रिश्चन समुदायांसाठी मास म्हणजे चर्चमधील प्रार्थनेचं आयोजन करतात. ही सर्व शहरं अॅमेझोनास राज्यातील आहेत.
नॅशनल कॉन्फरन्स ऑफ बिशप्स ऑफ ब्राझीलनं (CNBB) म्हटलं आहे की ब्राझीलमध्ये काम करत असलेल्या पाद्रींची त्यांच्या राष्ट्रीयत्वावर आधारित आकडेवारी त्यांच्याकडे नाही.
मात्र, इंटरकल्चरल ट्रेनिंग सेंटर (Cenfi) या परदेशी पाद्रींना या भागातील वास्तव्यासाठी प्रशिक्षित करणाऱ्या मुख्य केंद्रातील आकडेवारीतून दिसतं की इथे सेवारत असणारे बहुसंख्य परदेशी पाद्री हे भारतीय आहेत.
नॅशनल कॉन्फरन्स ऑफ बिशप्स ऑफ ब्राझील (CNBB) नुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये, भारतातील पुरुष आणि महिला हा सांस्कृतिक दीक्षा अभ्यासक्रमात सहभागी होणारा सर्वात मोठा गट आहे. यात एकूण 18 पोर्तुगीज वर्ग आणि 13 इंडोनेशियनचा देखील समावेश आहे.
मिशनरींच्या स्वत:च्याच अंदाजानुसार, सध्या ब्राझीलमधील कॅथलिक चर्चमध्ये 100 हून अधिक भारतीय पाद्री सेवारत आहेत.
सर्वसाधारणपणे, ब्राझीलमध्ये येणारे भारतीय मूळातच कॅथलिक कुटुंबातून आलेले आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येत ख्रिश्चन समुदायाचं प्रमाण हिंदू आणि मुस्लीम समुदायांच्या तुलनेत फारच कमी म्हणजे जरी फक्त 2 टक्केच असलं, तरी देखील त्यांची संख्या लक्षात घेता ती जवळपास 3 कोटी इतकी आहे.
भारतीयांना दिलेली पहिली हाक
फेडरल महामार्गाच्या कडेला, मातो ग्रोसो डो सुलमधील कॅम्पो ग्रांदे शहरातून बाहेर पडणाऱ्या एका रस्त्यावर वरच्या बाजूला क्रॉस असलेलं एक प्रवेशद्वार आणि 'दिव्यत्व शोधा' (फाईंड द डिव्हाईन) असं लिहिलेली खूण ब्राझिलमध्ये येणाऱ्या भारतीयांच्या गटाचं स्वागत करते.
तिथेच सितिओ पेरोलामध्ये मिशनरीज ऑफ मेरी इमॅक्युलेट (MMI)चं 'मदर हाऊस' आहे. 1990 च्या दशकाच्या शेवटी भारत आणि ब्राझीलमध्ये थेट संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा गट तयार करण्यात आला होता.
आता 78 वर्षांचे असणाऱ्या फादर जेसुधास जेसुआदिमाई फर्नांडो यांचा तेव्हा मातो ग्रोसो डू सुलच्या पँटनल प्रदेशात गंभीर कार अपघात झाला होता. त्यावेळेस फादर अरुल राज त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजे फादर जेसुधास यांना भेटायला आले होते. या भेटीतून या कॅथलिक समुदायाचा जन्म झाला.
आपल्या भेटीच्या वेळेस फादर अरुल राज यांना कॅम्पो ग्रांदेचे तत्कालीन आर्चबिशप डोम व्हिक्टोरिओ पावनेलो यांनी विनंती केली होती.
"जेव्हा तो मला भेटायला आला होता, तेव्हा आर्चबिशपांनी विचारलं की ते ब्राझिलसाठी पाद्रींची व्यवस्था करू शकतील का आणि त्यांनी त्याला ख्रिस्ती मिशनची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिलं," असं फादर जेसुधास सांगतात. 1989 मध्ये ते सर्वात आधी ब्राझीलमध्ये आले होते.
त्यावेळेस ,भारतातील वृत्तपत्रात बातमी छापून आली होती की ब्राझीलमध्ये 'पाद्रींची कमतरता' असल्यामुळे दरवर्षी 2,00,000 कॅथलिक लोकांचं प्रोटेस्टंट किंवा इव्हँजेलिकल ख्रिश्चन समुदायात (evangelical Christianity) रुपांतर होतं आहे. ही बातमी वाचून जेसुधास ब्राझीलमध्ये आले होते. या गोष्टीला आळा घालण्यासाठी ते ब्राझीलमध्ये आले होते.
कॅम्पो ग्रांदेमध्ये, नवीन चर्चचं बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या मदतीनं जेसुधास पोर्तुगीज भाषा शिकले. नंतर ते ग्रामीण भागात गेले. तिथे त्यांनी कोळशाच्या कारखान्यात कामगारांसाठी चांगली स्थिती असावी यासाठी काम केलं.
त्यांनीच मिशनरीज ऑफ मेरी इमॅक्युलेट (MMI)च्या पहिल्या मिशनरीचं (धर्मप्रचारक) स्वागत केलं. त्यानंतर अॅमेझॉन मधील बिशप बरोबर प्रारंभिक संपर्क केला. ते सांगतात की "तिथे भारतीय मिशनरींना पाठवण्याचा प्रयत्न करण्याची ते आम्हाला विनंती करायचे."
ब्राझीलमध्ये नव्यानं आलेल्या भारतीयांना 'सितिओ पेरोला' मध्ये, सहा महिने पोर्तुगीज भाषा शिकवली जाते आणि ब्राझीलच्या संस्कृतीची ओळख करून दिली जाते.
सध्या संपूर्ण ब्राझीलमध्ये मिशनरीज ऑफ मेरी इमॅक्युलेट (MMI) चे 11 पाद्री आहेत. त्यातील पाच मातो ग्रोसो डो सुलमध्ये आणि सहा अॅमेझोनासमध्ये आहेत. याशिवाय किमान आठ पाद्री या गटातून अॅमेझॉन मध्ये पॅरिशर्सचे सदस्य होण्यासाठी गेले आहेत.
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, हे असे पाद्री आहेत ज्यांचं रुपांतर बिशपच्या नियंत्रणाखालील चर्चच्या 'धार्मिक' (जे चर्चशी निगडीत समुदायाशी जोडलेले असतात आणि समुदायात राहतात) पाद्रीतून 'धर्मनिरपेक्षवादी' पाद्री (जे पॅरिशसाठी काम करतात आणि त्यांना मालमत्ता बाळगण्याचा आणि पगार घेण्याची परवानगी असते) मध्ये होतं.
फादर जोसेफ राज यांच्याबाबतीत देखील असंच आहे. ते 10 वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये आले होते. त्यानंतर 2020 मध्ये ते अॅमेझोनास मधील बोर्बाच्या पॅरिश (चर्चच्या पाद्रीच्या अधिकाराखाली येणारा प्रदेश आणि ख्रिश्चन समुदाय) मध्ये काम करण्यासाठी कायमचे परतले होते.
"जेव्हा एखादा पाद्री इथे येतो, तेव्हा तो एक उत्सव असतो," असं फादर राज म्हणाले. ते सँटो अँटोनियो डी बोर्बाच्या बॅसिलिकाचं (पोपकडून विशेष अधिकार मिळालेलं चर्च) प्रशासन सांभाळतात. मॅडिरा नदीच्या काठावर हे एक मोठं निळं चर्च आहे.
फादर राज अस्खलित पोर्तुगीज भाषेत बोलतात. ते सांगतात की ते अमेरिकेत वास्तव्यास असण्याच्या काळात, जिथे "कशाचीही कमतरता नाही", त्यांना या गोष्टीचा बोध झाला की "पैसा आणि सुखवस्तूपणा यामुळे आयुष्य अर्थपूर्ण होत नाही."
मिशनरीज ऑफ मेरी इमॅक्युलेट (MMI) मधून पाद्री तयार होण्यापूर्वी ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले आणि डिव्हाईन वर्ड मिशनरींशी संलग्न असलेले किमान 30 पाद्री आहेत. ते ब्राझीलच्या पॅरा, रोराईमा, अमापा, रिओ डी जनेरियो आणि साओ पाउलो सारख्या प्रांतामध्ये काम करत आहेत, अशी माहिती फादर जोआकिम अँड्रेड देतात. 32 वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये स्थायिक झालेल्या सुरूवातीच्या भारतीय मिशनरींपैकी (धर्मप्रचारक) ते एक आहेत.
फादर जोआकिम यांनी ब्राझीलमध्ये राहणाऱ्या भारतीय मिशनरींचे मेळावे आयोजित केले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, ब्राझीलमध्ये चर्चशी निगडीत एकूण 130 भारतीय पाद्री आहेत.
युरोपातून पाद्री येणं 'थांबलं'
या आकडेवारीतून दिसून येतं की कशाप्रकारे युरोपसारखे प्रदेश जिथून पारंपारिकरित्या ब्राझीलमध्ये पाद्री पाठवले जायचे ते स्त्रोत आता थंडावले आहेत किंवा तिथून पाद्री येणं बंद झालं आहे, असं डॉम मॉरिसिओ दा सिल्वा जार्डिम म्हणतात. ते सीएनबीबीमधील एपिस्कोपल कमिशन फॉर मिशनरी अॅक्शन आणि इंटर-चर्च को-ऑपरेशनचे अध्यक्ष आहेत.
"पूर्वी अनेक इटालियन, जर्मन आणि स्पॅनियार्ड पाद्री इथे आले होते. मात्र आता युरोपमधून पाद्री येत नाहीत. आशिया आणि आफ्रिकेतून येणारे पाद्री हेच इथल्या चर्चचं भवितव्य आहे," असं ब्राझीलमधील पाद्रींच्या स्थितीबद्दल डॉम मॉरिसिओ सांगतात.
20 व्या शतकाच्या मध्यापासून कॅथलिक चर्चच्या विस्तारामध्ये, विशेषकरून अॅमेझॉनच्या खोऱ्यात, परदेशी पाद्री किंवा मिशनरींनी मूलभूत भूमिका बजावली आहे आणि ते अजूनही बजावत आहेत, असं मत इतिहासकार दिएगो ओमर दा सिल्व्हेरा मांडतात. ते स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ अॅमेझोनास (UEA) मधील धार्मिक अभ्यास कार्यक्रमाचे समन्वयक आहेत.
"जुन्या ऐतिहासिक दस्तऐवजांमधील नोंदींमधून दिसतं की काही बाबतीत, जेव्हा युरोपच्या लक्षात आलं होतं की लॅटिन अमेरिकेत मिशनरींचा विस्तार करता येईल, तेव्हा येथील एकूण पाद्रींपैकी 80 टक्क्यांपर्यंत पाद्री परदेशी होते. ते जर्मनी, इटली आणि युरोपातील इतर देशांमधून आले होते," असं अॅमेझॉनमधील धर्माच्या इतिहासाचे तज्ज्ञ म्हणतात.
संशोधक सांगतात की 1870 आणि 1950 दरम्यान अॅमेझॉनमध्ये कॅथलिक धर्मप्रचारक पसरण्यास सुरुवात झाली. त्यातून या भागात परदेशी लोकांचं कायमस्वरुपी वास्तव्यं निर्माण झालं.
कॅथलिक धर्म प्रचाराच्या या चळवळीमुळे उत्तर ब्राझीलमध्ये बिशपच्या कार्यक्षेत्राची निर्मिती झाली. हे त्या काळात घडलं जेव्हा लॅटिन अमेरिकेसारख्या पूर्वी कॅथलिकांची वसाहत असलेल्या प्रदेशांमध्ये प्रोटेस्टंट चळवळ किंवा इव्हॅंजिकल चळवळ पुढे जात होती, असं सिल्व्हेरा सांगतात.
"इथल्या नदीकाठच्या भागाचं आणि स्थानिक समुदायाचं आपण योग्यरितीनं ख्रिस्तीकरण करणार आहोत असं म्हणत प्रोटेस्टंट या भागात आले. त्यांना कॅथलिक चर्चनं वेगानं प्रतिसाद दिला," असं ते पुढे म्हणतात.
प्राध्यापकांचा युक्तिवाद आहे की सध्या आलेली मिशनरींची (धर्मप्रचारक) लाट इव्हँजेलिकल चर्च म्हणजे प्रोटेस्टंटांच्या वाढीला आळा घालण्याचा प्रयत्न करते आहे. कॅथलिक चर्चच्या कठोर आणि नोकरशाही रचनेच्या तुलनेत प्रोटेस्टंटसाठी अॅमेझॉनच्या खोऱ्यात त्यांची चर्च स्थापन करणं आणि त्यांचे पेस्टर म्हणजे पाद्री पाठवणं खूपच सोपं आहे.
2010 च्या जणगणनेमध्ये ब्राझीलच्या उत्तर भागात (जिथे अॅमेझॉनचं खोरं आहे) कॅथलिक धर्माची सर्वाधिक घसरण झालेली दिसून आली. 2000 ते 2010 या कालावधीत या भागातील कॅथलिक लोकसंख्या 71.3 टक्क्यांवरून घसरून 60.6 टक्क्यांवर आली.
त्यातुलनेत या भागात प्रोटेस्टंट किंवा इव्हँजेकिल समुदायाच्या लोकसंख्येत वाढ होत तो 19.8 टक्क्यांवरून वाढून 28.5 टक्क्यांवर पोहोचला. प्रोटेस्टंट पाद्रींनी इथे केलेल्या धर्मप्रसाराच्या कामाचा हा परिणाम होता.
2020 मध्ये डेटाफोल्हा सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, उत्तर ब्राझीलमध्ये 50 टक्के लोक कॅथलिक आहेत तर त्या तुलनेत 39 टक्के लोक प्रोटेस्टंट किंवा इव्हँजेलिकल आहेत.
चर्चच्या पाद्रींनुसार, ब्राझीलमध्ये 'व्यवसाय-धंद्यांची' देखील कमतरता आहे. म्हणजेच काही पुरुषांना असं वाटतं की त्यांना देवानंच धार्मिक जीवन जगण्यास सांगितलं आहे.
हा तुटवडा विशेषकरून अॅमेझॉनच्या खोऱ्यात दिसून येतो. 2020 मध्ये इथे अपेक्षा होती की पोप फ्रान्सिस कदाचित कुटुंब असलेल्या विवाहित पुरुषांना दुर्गम भागामध्ये पाद्री म्हणून काम करण्यास परवानगी देतील.
या मुद्द्यावर अॅमेझॉन सिनॉडमध्ये चर्चा झाली. व्हॅटिकननं म्हणजे पोप यांनी बिशपंचं हे संमेलन बोलावलं होतं. पाद्रींचा तुटवडा दूर करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्या पाद्रींच्या तुटवड्याविषयी चर्चा करण्यात आली.
अखेर पोप फ्रान्सिस यांनी विवाहित पाद्रींना परवानगी देण्याची सूचना फेटाळून लावली. चर्चशी निगडीत कामामध्ये ब्रह्मचर्य संपवण्यासंदर्भातील कोणत्याही चर्चेला विरोध करणाऱ्या चर्चमधील पुराणमतवादी गटाचा हा विजय होता.
एकीकडे युरोपातील पाद्रींचा पुरवठा थंडावलेला तर दुसरीकडे पोपनं विवाहीत पाद्रींना परवानगी नाकारली. अशा वेळी अॅमेझॉनच्या खोऱ्यात कॅथलिक चर्चच्या पाद्रींची संख्या वाढण्याचा कोणताही पर्याय नसताना, भारतीय लोक ही 'उणीव भरून' काढण्यासाठी येत आहेत, असं फादर जोआकिम अँड्रेड म्हणाले. सध्या ते पाद्री असण्याबरोबरच पॉंटिफिकल कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ पराना (PUC-PR) मध्ये धर्मशास्त्राचे प्राध्यापक देखील आहेत.
डोम मॉरिसिओ यांच्या मते, ब्राझीलमध्ये पाद्रींच्या 'अभावा'पेक्षा पाद्रींच्या असमान वाटपाची समस्या अधिक आहे. ब्राझीलमधील सर्वात गरीब भागात, जिथे खूप अंतर पार करावं लागणार आहे, काम करण्यासाठी फार थोडे लोक इच्छूक आहेत.
ब्राझीलमध्ये भारतातूनच पाद्री का आले?
फादर जोआकिम अँड्रेड 32 वर्षांपूर्वी जेव्हा ब्राझीलमध्ये आले, तेव्हा त्यांची भेट ज्या मोजक्या भारतीयांशी झाली, ते गोव्यातील होते. फादर जोआकिम यांचं कॅथलिक कुटुंब देखील मूळचं गोव्याचंच आहे.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं गोवा ही आधी एक पोर्तुगीज वसाहत होती. म्हणूनच फादर अँड्रेड यांचं आडनाव तसं आहे.
फादर जोआकिम सांगतात, भारतात हिंदू धर्माचं प्राबल्य असून देखील इतिहास काळात तिथे ख्रिश्चन धर्माचं नेहमीच अस्तित्व होतं. भारतीय कॅथलिकांची विभागणी सर्वसाधारणपणे तीन ऐतिहासिक गटात झाली आहे.
पहिला गट, 2,000 वर्षांपूर्वी सेंट थॉमस यांनी इथे भेट दिल्यानंतर ज्यांनी धर्मांतर केले तो गट. ते सेंट थॉमस ख्रिश्चन्स म्हणून ओळखले जातात. त्यानंतर दुसरा गट म्हणजे 500 वर्षांपूर्वी गोव्यातील पोर्तुगीजांच्या उपस्थितीमुळे ज्यांनी धर्मांतर केले ते, आणि तिसरा गट म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकात युरोपियन धर्मप्रचारकांमुळे धर्मांतर केलेले लोक.
आज अंदाजे 2 टक्के भारतीय ख्रिश्चन मुख्यत: दक्षिणकेडील तामिळनाडू सारख्या राज्यात केंद्रित झाले आहेत. यातील बहुतांश कॅथलिक जरी असले तरी त्यात विविध संप्रदायातील प्रोटेस्टंट किंवा इव्हँजेलिकल देखील आहेत.
दुराई अरुल दास सितिओ पेरोलाचं व्यवस्थापन करतात. तसंच ते कॅम्पो ग्रांदेमध्ये पाद्री देखील आहेत. ते म्हणतात, भारतातून ब्राझीलमध्ये आणखी पाद्री आणण्यासाठी त्यांना अजूनही विनंती केली जात असते.
सध्या त्यांच्या गटातील म्हणजे मिशनरीज ऑफ मेरी इमॅक्युलेट (MMI) पाद्री 'धर्मप्रचाराचं काम' करत आहेत. यातील सर्वात नवीन गट 2022 मध्ये इथे आला होता.
"अधिक पाद्रींबद्दल आम्ही आधीच विचारणा केली आहे. कारण धर्मप्रचाराच्या कामासाठी आम्हाला तातडीनं पाद्री हवे आहेत. अधिक पाद्री कधी पाठवता येतील यावर ते काम करत आहेत," असं 2011 पासून ते ब्राझीलमध्ये असणारे दुराई म्हणतात. ते देखील मूळचे तामिळनाडूतील आहेत.
फादर दुराई पुढे सांगतात की भारतातील लोकसंख्येच्या आकारामुळं अधिक पुरुष पाद्री बनत आहेत. ज्या कुटुंबांमध्ये अधिक मुलं आहेत अशा कुटुंबांकडून त्यांच्या घरातील एखाद्या मुलानं धार्मिक जीवनाच्या मार्गावर जाण्याची बाब स्वीकारली जाण्याची शक्यता अधिक असते.
याशिवाय, फादर दुराई आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधतात. तो म्हणजे, भारतीय संस्कृती 'समर्पण किंवा भक्ती' अधिक आहे आणि जगात मिळणाऱ्या 'स्वातंत्र्या'ला लोक फारसं महत्त्व देत नाहीत.
मात्र, भारतातील परिस्थिती झपाट्यानं बदलू शकते. फादर जोसेफ राज म्हणतात की भारतातील त्यांच्या कॅथलिक पाद्री सहकाऱ्यांकडून त्यांना माहिती मिळत असते की अलीकडच्या काळात छोटी कुटुंब आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे व्यवसाय-धंद्यात घट होत आहे.
"ते जगातील शक्ती किंवा सामर्थ्याकडे आकर्षित झाले आहेत आणि त्यांना जे आवडतं तेच करण्याची इच्छा आहे," असं फादर राज म्हणतात.
अॅमेझॉनच्या खोऱ्यातील जीवन
फादर जेसुधास फर्नांडो यांना अजूनही ब्राझीलमध्ये एक महिनाभर देखील राहू न शकलेला एक भारतीय मिशनरी किंवा पाद्री आठवतो.
त्यांना आठवतं की तो तरुण पाद्री चर्चमधील प्रार्थनेच्या वेळेस मन एकाग्र करू शकत नव्हता. कारण तिथल्या महिलांनी खूपच आखूड किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केले होते.
फादर जेसुधास म्हणाले, "तो मला म्हणाला, फादर मी जर इथं राहिलो तर धर्मप्रचाराच्या कामापासून मी दूर जाईन."
फादर जेसुधास यांना आठवतं की ते जेव्हा ब्राझीलमध्ये आले, तेव्हा त्यांच्यासाठी देखील हा एक मोठा सांस्कृतिक धक्का होता. ते सांगतात, "मला वाटलं होतं की इथले लोक इतके गरीब आहेत की त्यांना अंगभर कपडे परिधान करणं परवडत नसावं."
मात्र, त्या तरुण पाद्रीचं उदाहरण अपवादात्मक आहे. सर्वसाधारणपणे, भारतीय लोक ब्राझीलच्या संस्कृतीशी चांगल्या पद्धतीनं जुळवून घेतात. त्याचबरोबर पोर्तुगीज भाषा देखील सहजपणे शिकल्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
"भारतीय पाद्री खूपच दृढनिश्चयी आहेत," असं सीएनबीबीमधील डोम मॉरिसिओ दा सिल्व्हा जार्डिम म्हणतात.
ब्राझीलमध्ये भारतातून आलेल्या पाद्रींसाठीचा सर्वात संवेदनशील आणि कळीचा मुद्दा म्हणजे तिथलं अन्न. भारतात त्यांना कढीपत्ता, मसाले वापरून तयार केलेले अन्नपदार्थ खाण्याची सवय असते. त्यामुळेच जेव्हा हे पाद्री भारतात जातात तेव्हा अनेकदा सोबत मसाले घेऊन येतात किंवा आपल्या मित्रांकरवी भारतीय मसाले मागवून घेतात.
"सुरूवातीला ही गोष्ट सोपी नसते. आम्ही ज्या संस्कृतीतून आलो आहोत ती तशी खुलेपणानं फारसं स्वीकारत नाही, ती अंतर राखते. मला वाटतं की आपण इथे टिकू शकणार नाही. मात्र देवाची कृपा. त्याला माहित आहे की त्याने मला इथे का आणलं आहे," असं फादर दुराई अरुल दास म्हणतात.
ब्राझीलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांच्या दृष्टीकोनातून, ब्राझील आणि भारतीय संस्कृतीची चांगली 'वीण' बांधली गेली आहे.
फादर जोआकिम अँड्रेड यांना वाटतं की भारतीय पाद्री ब्राझीलमध्ये मौन, ध्यान आणि अध्यात्माची शिकवण देतात. तर दुसऱ्या बाजूला ब्राझीलमधील लोक, समुदायात अधिक मिसळून कसं जगायचं आणि "देवाच्या शिकवणीचा प्रचार करण्याचं चर्चचं" काम कसं करायचं हे शिकवतात.
सीएनबीबीमधी डॉम मॉरिसिओ दा सिल्व्हा जार्डिम म्हणतात, "भारतीयांची उपस्थिती ब्राझीलमधील चर्चना समृद्ध करते."
बीबीसी न्यूज ज्या ज्या भारतीय पाद्रींशी बोललं, त्या सर्वांनी सांगितलं की ब्राझील आणि विशेषकरून अॅमेझॉनचं खोरं सोडून जाण्याचा त्यांचा अजिबात विचार नाही.
फादर अर्सेलिन एसॅक म्हणतात की अकाई, तुकुमा, कुपुआकू आणि तापेरेबा सारख्या स्थानिक फळांचा ते आस्वाद घेतात. तसंच अॅमेझॉनच्या खोऱ्यातील नद्यांमध्ये बोडो आणि पिरान्हा मासे पकडण्यास देखील ते शिकले आहेत.
मॅनाक्विरी हे ब्राझीलच्या अॅमेझोनास प्रांतातील एक शहर आहे. त्या भागातील एक म्हण आता फादर अर्सेलिन यांच्या आयुष्याचा भाग झाली आहे. ती म्हण अशी आहे, "एकदा का तुम्ही जराकी मासा खाल्ला, की तुम्ही इथून कधीही जात नाही."
या म्हणीप्रमाणेच फादर अर्सेलिन आणि इतर भारतीय पाद्रीदेखील आता ब्राझीलमध्ये रमले आहेत, तिथल्या समाजजीवनाचा भाग झाले आहेत. धर्मप्रचाराचं काम करताना त्यांनी ब्राझीलची संस्कृती फक्त स्वीकारलीच नाही तर ते त्या संस्कृतीचाच एक भाग देखील झाले आहेत.
एरवी ब्राझील म्हटलं की महाकाय अॅमेझॉन नदी, तिथलं अफाट घनदाट आणि भीतीदायक जंगल, वन्यजीव हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. भारतातून तिथे गेलेले पाद्री मात्र भारतीय आणि ब्राझिलियन संस्कृतीचा संगम साधत वेगळीच किमया करत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)