नितेश राणे ते मुंडे भाऊ-बहीण, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात घराणेशाहीचा दबदबा

इंद्रनील नाईक, आदिती तटकरे, नितेश राणे

फोटो स्रोत, Facebook

महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. नागपूरमधील राजभवनाच्या लॉनवर राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, अशी चर्चा सुरू होती आणि या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.

मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारावर नजर टाकल्यास घराणेशाहीची छाप दिसून येते.

विधानसभा निकालातही घराणेशाहीचा दबदबा दिसून आला होता. बीबीसी मराठीनं त्यासंबंधी सविस्तर बातमीही केली होती. ती तुम्ही इथे वाचू शकता.

नितेश राणे

नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नितेश हे पुत्र आहेत.

नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणेही यंदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत.

नारायण राणे आणि नितेश राणे

फोटो स्रोत, Facebook

इंद्रनील नाईक

इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार आहेत.

नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमत्री वसंतराव नाईकांचे नातू आहेत.

पुसद मतदारसंघावर गेली 72 वर्षे नाईक कुटुंबातूनच आमदार निवडून येतो आहे.

आदिती तटकरे

आदिती तटकरे या रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या आमदार आहेत.

रायगडचे खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत.

आदिती तटकरे यांचे बंधू अनिकेत तटकरे, काका अनिल तटकरे हे विधान परिषदेत आमदार होते, तर चुलत भाऊ अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघाचेच माजी आमदार आहेत.

मुंडे भाऊ-बहीण

धनंजय मुंडे हे परळीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार आहेत.

यापूर्वीही त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात कृषि, समाजकल्याण अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत.

तर पंकजा मुंडे या विधान परिषदेत भाजपच्या आमदार आहेत आणि त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Facebook

राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वीही त्यानी महसूलसारखं महत्त्वाचं खातं सांभाळलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्र आहेत.

तर अहमदनगर मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षांतर करत ते भाजपमध्ये सामील झाले.

राधाकृष्ण विखे पाटील

शंभूराज देसाई

शंभूराज देसाई हे साताऱ्यातील शिंदे गटाचे नेत आणि आमदार आहेत.

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे ते नातू आहे.

शंभूराज देसाई यापूर्वीच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते.

आकाश फुंडकर

आकाश फुंडकर हे भाजपचे आमदार आहेत.

भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे आकाश हे पुत्र आहेत. पांडुरंग फुंडकर यांनी खासदार आणि आमदार अशी दोन्ही पदं भूषवली होती.

विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवलं होतं.

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रसिंह राजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

साताऱ्याचे माजी खासदार अभयसिंहराजे भोसले यांचे शिवेंद्रसिंह राजे हे पुत्र होत.

तर साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले हे शिवेंद्रसिंह राजेंचे चुलत भाऊ आहेत.

शिवेंद्रसिंहराजे भोसले

अतुल सावे

अतुल सावे हे भाजपचे आमदार पुन्हा मंत्री झाले आहेत.

माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे अतुल सावे हे पुत्र होत.

अतुल सावे हे यापूर्वीच्या मंत्रिमंडळात ओबीसी मंत्री होते.

मेघना बोर्डीकर

मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

परभणी जिल्ह्यातील राजकारणावर गेली काही दशकं आपलं वर्चस्व कायम राखणाऱ्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मेघना या कन्या आहेत.

रामप्रसाद बोर्डीकर हे काँग्रेसकडून 5 वेळा आमदार होते.

मेघना बोर्डीकर

जयकुमार रावल

जयकुमार रावल हे सिंदखेडाचे भाजप आमदार आहेत. त्यांनी यापूर्वीही मंत्रिपदं भूषवली आहेत. आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतलीय.

माजी आमदार दादासाहेब रावल हे जयकुमार रावल यांचे आजोबा होत.

मकरंद जाधव-पाटील

साताऱ्यातील वाईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मकरंद जाधव-पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीय.

साताऱ्याचे दोनवेळा खासदार राहिलेल्या लक्ष्मणराव जाधव-पाटील यांचे मकरंद जाधव-पाटील हे पुत्र होत.