एव्हियन फ्लू : नागपुरात वाघांच्या मृत्यूनंतर पसरलेला H5N1 विषाणू नेमका काय आहे?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू एव्हियन फ्लू ( Avian flu ) म्हणजेच H5N1 या विषाणूची लागणमुळे झाला असल्याची माहिती आहे.
त्यामुळं केंद्र सरकारच्या पशू संवर्धन मंत्रालयानं या प्रकरणी योग्य खबरदारी आणि उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसं या प्रकरणी सविस्तर अहवालही मागवला आहे.
तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राणी संग्रहालय, रेस्क्यू सेंटर आणि तत्सम संस्थांना तातडीनं याप्रकरणी खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डिसेंबरच्या अखेरीस या वाघांची आणि बिबट्याची तब्येत खराब झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरू होते. पण अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर त्यांना H5N1 विषाणूची लागण म्हणजेच एव्हियन फ्लू झाल्याचं समोर आलं होतं.
यालाच बर्ड फ्लू असंही म्हटलं जातं. कारण कोंबड्या किंवा पक्ष्यांनाही या H5N1 विषाणूची लागण झाल्याने त्यांच्यात आजार पसरत असतो.
नागपुरात काय घडले?
या प्रकरणी बीबीसी मराठीनं विभागीय वनाधिकारी शतानिक भागवत यांच्याकडून माहिती घेतली. त्यानुसार गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघ आणि एका बिबट्याचा एव्हियन फ्लू मुळे मृत्यू झाला आहे.
भागवत म्हणाले की, "डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हे प्राणी आजारी असल्याची लक्षणं दिसत होती. पण त्यांना अमुक रोगाची लागण झाली हे लगेच सांगता येत नाही. लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
"पण उपचार सुरू असतानाच अचानक 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली त्यानंतर त्यांना व्हायरल इन्फेक्शन असल्याचं समोर आलं," भागवत म्हणाले.
मृत्यूनंतर शवविच्छेदन करून त्यांचे सॅम्पल भोपाळला ICAR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सेक्युरिटी अॅनिमल डिसिज प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. भोपाळवरून या प्राण्याना बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं, असंही त्यांनी सांगितंलं.
आपल्या देशात वाघांना बर्ड फ्लूची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे, असं विभागीय वनाधिकारी शतानिक भागवत यांनी सांगितलं.
काय लक्षणे दिसली?
भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातील दोन वाघ आणि बिबट्या यांच्याच ताप, नाकातून पाणी येणे, लंगडणे अशी लक्षणं दिसून आली होती. पण नंतर त्यांची प्रकृती खालावली.
या वाघांपैकी एका वाघात तर काहीच लक्षणे दिसली नाहीत. अचानक 24 तासात तो वाघ गंभीर झाला. खूप ताप आला, आणि मृत्यू झाला, असंही त्यांनी सांगितलं.
काय काळजी घेतली जात आहे?
मृत्यू झालेले वाघ हे रेस्क्यू सेंटरमधील एका कोपऱ्यातील वाघ होते. तो भाग पूर्णपणे आयसोलेट केलेला आहे. तिथं इतर प्राण्यांना जाऊ दिले जात नाही.
तसंच वेगवेगळे केमिकल्स वापरून याठिकाणी दररोज निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. तिथं काम करणाऱ्या लोकांनाही दुसऱ्या भागात प्रवेश दिला जात नाही. हे वाघ आणि बिबट्या ज्या पिंजऱ्यात होते त्या पिंजऱ्यांनाही फिल्म गन वापरून निर्जंतुकीकरण करण्यात आलं.
परिसरात कुठेही अशी लक्षणे आढळलेला प्राणी, पक्षी दिसला तर आम्हाला कळवण्याच्या सूचना रेस्क्यू सेंटर आणि प्राणी संग्रहालयात देण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही भागवत यांनी दिली.
एव्हियन फ्लूबाबतचे दिशानिर्देश
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील प्राण्यांचा एव्हियन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर याचा प्रसार रोखण्यासाठी काही दिशानिर्देश देण्यात आले आहेत.
त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांमध्ये एव्हियन फ्लूची लक्षणं तर आढळत नाहीत यासाठी त्यांच्यावर सातत्यानं नागराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशय आल्यास तातडीने त्यांचे सँपल घेऊन तपासणीसाठी पाठवण्यास सांगण्यात आलं आहे.
इतर प्राणी किंवा पक्षी यांच्यात प्रसार किंवा संसर्ग रोखण्यासाठी प्राण्यांना शक्यतो एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आलं आहे.
यात लवकरात-लवकर निदान करून इतर प्राण्यांत लागण झालेली आढळल्यास त्यांचं विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्राण्यांबरोबर काम करणारे आणि संग्रहालयातील कर्मचारी यांना लागण होऊ नये म्हणून पीपीई किट, मास्क, ग्लोव्ह्ज यांचा वापर करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांपैकी कुणाला ताप किंवा इतर काही लक्षणं आढळली तर त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध करून देऊन काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एव्हियन फ्लूच्या संदर्भात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यासही सांगण्यात आलं आहे. तसंच यात दिसणारी लक्षणं, श्वसनाबाबतच्या समस्या, प्राण्यांशी कशा प्रकारे वर्तन असावे याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राण्यांना दिला जाणारा आहार कसा असावा याबाबतही सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.
सातत्यानं निर्जंतुकीकरण करण्यासह, नवीन येणाऱ्या प्राण्यांना किमान तीन दिवस विलगीकरणात ठेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
काय आहे एव्हियन फ्लू?
एव्हियन फ्लू किंवा एव्हियन इनफ्लूएन्झा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. यालाच 'बर्ड फ्लू' असंही म्हणतात. साधारणपणे हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे.
अनेकदा स्थलांतरीत पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं आणि तो इतर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्येही पसरू शकतो.
H5N1 हा असा एकटाच एक विषाणू नाही. त्याचे सोळा व्हेरियंट आहेत. याचाच एक व्हेरियंट गेल्या काही वर्षांत जगभरातल्या प्राण्यांमध्ये पसरतो आहे.
वेंडी बार्कले लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि त्या विषाणूंचा अभ्यास करतात. त्यांच्या मते, "हा एक अतिशय चिवट व्हायरस आहे, तो पक्ष्यांमार्फत दूरवर पोहोचतो आहे."
1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता.
पण हा फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.