श्याम बेनेगल : 'समांतर सिनेमा' या शब्दाशी सहमत नसलेल्या वास्तवदर्शी दिग्दर्शकाशी 'एक मुलाकात'
प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं आहे. ते वयाच्या 90 वर्षांचे होते. मुंबईच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंकुर (1973), निशांत (1975), मंथन (1976), भूमिका (1977), मम्मो (1994), सरदारी बेगम (1996) आणि झुबेदा (2001) यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांसाठी बेनेगल यांना ओळखलं जात होतं. श्याम बेनेगल यांनी व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांचा ठसा उमटवला होता.
बीबीसी हिंदीच्या 'एक मुलाकात' या विशेष कार्यक्रमात 2009 मध्ये श्याम बेनेगल यांनी त्यांचा प्रवास सांगितला होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ती मुलाखत इथे पुन्हा एकदा प्रकाशित करत आहोत.
सर्वप्रथम, आम्हाला सांगा की तुम्ही चित्रपट निर्माता होण्याचा कधी विचार केला?
ही खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा मी सहा-सात वर्षांचा होतो. आम्ही सिकंदराबाद लष्करी छावणीत राहत होतो. गॅरिसन सिनेमा होता. जेव्हा मी तिथे पहिल्यांदा चित्रपट पाहिला तेव्हा मी इतका मंत्रमुग्ध झालो होतो की, जणू काही वेगळ्याच जगात आलो आहे. चित्रपटांच्या दुनियेने मला त्यावेळी आकर्षित केलं आणि आजही हे जग मला खुणावत आहे.
तो पहिला चित्रपट कोणता होता?
मला वाटतं 'कॅट पीपल' हा इंग्रजी चित्रपट होता. ती एक हॉरर फिल्म होती. ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून तुम्ही असे काहीतरी करू शकता जे वास्तविक जगापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे चित्रपटांची ही खासियत मला आकर्षित करते आणि आजही ती भूक कायम आहे.
पण तुम्ही बनवलेले चित्रपट तर वास्तवाच्या खूप जवळ आहेत?
होय, अगदीच खरं आहे. काल्पनिक चित्रपट आणि माहितीपट यातील फरक हा आहे की माहितीपट हा तथ्यांवर आधारित असतो. साधारणपणे चित्रपट हे वास्तवावर आधारित असतात. यामध्ये परिस्थिती खरी असली तरी कल्पकतेची थोडी मदत घेतली जाते.
तुम्हाला समांतर सिनेमाचे जनक म्हणतात, हे ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटतं?
खरे तर कोणीतरी आपल्या सोयीसाठी 'समांतर सिनेमा' हा शब्दप्रयोग तयार केला आहे. म्हणजे तो मुख्य सिनेमापेक्षा वेगळा आहे अशा पद्धतीने दाखवला आहे. किंवा असे चित्रपट मनोरंजन देत नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा शब्दांशी मी कधीच सहमत नाही.
इतका की, प्रत्येक चित्रपट निर्माता आपापल्या पद्धतीने चित्रपट बनवतो. मला असं वाटायचं की, सामान्यतः सगळेच चित्रपट एकाच प्रकारे बनवलेले असतात आणि त्यात वेगळं करायला काही वाव नसतो.
तुमचा पहिला चित्रपट 'अंकुर'बद्दल आपण बोलूया. पण त्याआधी आम्हाला हे सांगा की, तुमचे नातेवाईक आणि उत्तम चित्रपट निर्माते असणाऱ्या गुरुदत्त यांचा तुमच्यावर किती प्रभाव होता?
मी त्यांच्यामुळे प्रभावित झालो नाही, पण त्यांचं व्यक्तिमत्त्व नक्कीच प्रेरणादायी होतं. 1950 मध्ये जेव्हा मी त्यांचा बाजी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली. हा चित्रपट पाहिल्यानंतर मी आता फक्त चित्रपटच बनवायचे असं ठरवलं होतं.
'बाजी' या चित्रपटात असं नेमकं काय होतं?
दोन गोष्टी होत्या. पहिली म्हणजे हिंदी चित्रपटांसाठी ती आधुनिक कथा होती, दुसरे म्हणजे त्यातील गाणीही वेगळी होती. चित्रपटाची दृश्ये ज्या पद्धतीने शूट करण्यात आली, त्याची शैलीही वेगळी होती.
त्या चित्रपटातले गाणे हा पटकथेचा महत्त्वाचा भाग होते. त्यांना एखाद्या आयटम नंबरसारखं चित्रपटात घुसवलेलं नव्हतं. मात्र, मला असा चित्रपट बनवायचा नव्हता. मला माझ्या प्रेरणेनुसार चित्रपट बनवायचा होता. मला कोणाची कॉपी करायची नव्हती.
गुरु दत्तचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडला?
मला 'साहब बीवी और गुलाम' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट वाटला. याशिवाय मला 'प्यासा' आणि 'कागज के फूल'ही खूप आवडतात.
तुम्ही गुरुदत्त यांना जवळून बघितलं होतं, ते खरोखर ट्रॅजेडी किंग होते का?
ते खूप हुशार आणि अंतर्मुख होते. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय मनोरंजक होते. ते खूप विचार करायचे. जे लोक सर्जनशील असतात ते अनेकदा नैराश्यात राहतात. त्यांना फारसे मित्र नव्हते. त्यांचे सहकारी त्यांच्या सर्वात जवळचे होते.
रहमान आणि जॉनी वॉकर हे त्यांचे चांगले मित्र होते. मला वाटतं की त्यांचा कोणावरही विश्वास नव्हता.
मग तुमच्यातही असे काही आहे का, की तुम्हालाही एकटेपणा आवडतो?
हे बघा, मी याआधीच म्हणालो की, सर्जनशील लोकांना अशा प्रकारची समस्या असते. पण याचा अर्थ असा नाही की, मी तुमच्यासमोर हे मान्य करेन.
तुमचा पहिला चित्रपट अंकुर होता. त्या चित्रपटाची कल्पना कुठून आली?
आम्ही शहराच्या बाहेरील भागात राहायचो. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी घरमालकाच्या मुलांसोबत आम्ही त्यांच्या फार्महाउसवर जात असू. तिथे जे काही वाटले. त्या घटना मी एका कथेच्या स्वरूपात लिहिल्या होत्या आणि ही कथा आमच्या कॉलेजच्या मासिकातही प्रसिद्ध झाली होती. त्याचवेळी मी या कथेवर माझा पहिला चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं.
तुम्ही या चित्रपटातून शबाना आझमी यांची ओळख जगाला करून दिली? आणि त्या चांगल्या कलाकार आहेत हे तुम्हाला कसं वाटलं?
केवळ शबानाच नाही तर माझ्यासह सर्व लोकांसाठी ही पहिलीच वेळ होती. शबनाकडे पाहूनच ती एक गुणी कलाकार असल्याचं जाणवायचं. तिच्यामध्ये खूप आत्मविश्वास होता, मात्र माझ्या चित्रपटासाठी ती माझी तिला पहिली पसंती नव्हती.
मला या चित्रपटात वहिदा रहमानला कास्ट करायचे होते, पण त्या वेळी ती मोठी स्टार होती आणि तिने ही भूमिका करण्यास नकार दिला. पण ती भूमिका नाकारून खूप मोठी चूक केल्याचे त्याने अनेक वर्षांनी मला सांगितले.
तुम्हाला आजवर एवढं यश मिळालं आहे. पाच बेस्ट फिचर फिल्म्सचे पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत. काय वाटतं?
खरंतर मला आजपर्यंत (2009) 27-28 पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार तुम्हाला ओळख मिळवून देतात आणि पुरस्कारांचं हेच काम आहे. मात्र तुमची खरी ओळख हे तुमचे प्रेक्षक बनवत असतात. तुम्ही बनवलेले चित्रपट त्यांना आवडतात की नाही हे जास्त महत्त्वाचं.
तुमच्या बालपणाबद्दल काही सांगाल का?
माझा जन्म हैदराबादमध्ये झाला. मी लहान असताना ते निजामाचे हैदराबाद होते, मोठे झाल्यावर हैदराबाद भारतात विलीन झालं. त्यामुळे अनेक ऐतिहासिक बदल मी पाहिले आहेत.
अजून एक गोष्ट म्हणजे हैदराबाद शहरात सरंजामशाही होती. मात्र, आम्ही जिथे राहत होतो तो कॅन्टोन्मेंट एरिया होता, तिथली विचारसरणी पूर्णपणे वेगळी होती.
मी कबूल करतो की माझे बालपण खूप चांगले होते. मी हैदराबादमधील पहिली इंग्रजी शाळा मेहबूब कॉलेज हायस्कूलमध्ये शिकलो.
तुमचे वडील सैन्यात होते का?
नाही, माझे वडील फोटोग्राफर होते. ते कलाकार असले तरी उदरनिर्वाहासाठी त्यांचा स्टुडिओ होता.
तुम्ही कुठून सुरुवात केली?
आधी मी एका जाहिरात संस्थेत काम केले. मुंबईत आल्यानंतर मी कॉपी एडिटर म्हणून काम करू लागलो. पहिल्या वर्षीच मी हिंदुस्थान लिव्हरसाठी जाहिरात लिहिली होती आणि तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.
सहा महिन्यांनंतर, मी जाहिरातपट बनवण्यास सुरुवात केली आणि 1000 हून अधिक जाहिराती बनवल्या. त्यामुळे शिकण्याच्या दृष्टीने ते माझ्यासाठी खूप चांगले होते.
मी माझा पहिला चित्रपट बनवला तोपर्यंत मला चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेची चांगली माहिती झाली होती. कदाचित यामुळेच 'अंकुर' बनवल्यानंतर व्ही शांताराम यांनी मला फोन केला तेव्हा, त्यांनी मला मी एवढा चांगला चित्रपट आणि मी आधी काय करायचो हे विचारलं.
त्यानंतर राज कपूर यांनीही मला विचारलं की, तू याआधी चित्रपट बनवलेला नसूनही एवढा चांगला चित्रपट नेमका कसा बनवला?
तुम्हाला राज कपूर कसे वाटायचे?
त्यांचे जुने चित्रपट चांगले होते. श्री 420, आवारा. मला वाटते आवारा हा एक उत्तम चित्रपट होता. मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या 'शोमन' या प्रतिमेवर जास्त लक्ष दिलं. ख्वाजा अहमद अब्बास, बीबी साठे हे राज कपूर यांच्या चित्रपटांच्या कथा लिहायचे. त्यांच्यासोबत राज कपूर यांनी अनेक चांगले चित्रपट बनवले.
राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये काही संदेश होता, असं तुम्हाला वाटत नाही का?
हो वाटतं की, त्यांच्या चित्रपटांमध्ये एक संदेश होता. वास्तविक पाहता, ते समाजाशी जोडून असलेले चित्रपट निर्माते होते.
त्याकाळात तुम्ही जाहिरातपट बनवत होता, त्याकाळात फीचर फिल्म्सच्या जगात तुमच्यावर इतर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला?
बघा, घरी माझ्या वडिलांना प्रभात फिल्म्स आणि न्यू थिएटरचे चित्रपट खूप आवडायचे. हे चित्रपट खूप चांगले होते. त्यात समाजसुधारणेचा विचार आणि संदेश होता. प्रभातचे चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाने भरलेले असत.
तर मला हॉलिवूडचे चित्रपट आवडायचे. आणि यापैकी जॉन फोर्ड, विल्यम वाइल्डर यांचेही चित्रपट मला आवडायचे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं.
तुमच्यावर प्रभाव पाडणारा एखादा चित्रपट सांगू शकाल?
मी लहान असताना मला मेहबूब खानचा औरत हा चित्रपट खूप आवडायचा. नंतर मेहबूब यांनी मदर इंडियाची निर्मिती केली. जो माझ्या मते आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.
आत्ताच आपण राज कपूरबद्दल बोलत होतो. सुभाष घई यांना आजच्या काळातील शोमन म्हटले जाते. तुम्हाला ते राज कपूरसारखे वाटतात का?
बघा, सुभाष घई हे वेगळ्या धाटणीचे फिल्ममेकर आहेत. त्याचा संपूर्ण भर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावर आहे. तर अशा प्रकारे तो शोमन आहे. पण राज कपूर जरा वेगळा होता. त्याला स्वतःची पात्रे निर्माण करण्यात रस होता. ही पात्रे आरके लक्ष्मण यांच्या 'आम आदमी' व्यंगचित्रासारखी होती.
तुमचे पाच-सहा सर्वात आवडते चित्रपट कोणते आहेत?
मला राज कपूरचा 'आवारा', गुरु दत्तचा 'साहेब, बीबी और गुलाम', 'प्यासा' आणि बीआर चोप्राचा 'वक्त' आवडतो. हिंदी चित्रपटसृष्टी खूप मोठी आहे. अनेक चित्रपट बनत आहेत, त्यामुळे चित्रपट निवडणे खूप कठीण आहे.
तुम्ही नसरुद्दीन शाह, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा यांसारख्या चांगल्या कलाकारांसोबत काम केले. कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, हे तुम्ही कसं ठरवलं?
अर्थात, तुम्ही ज्या ज्या कलाकारांची नावं घेतली, ते सर्व कलाकार कोणतीही भूमिका करू शकतात. मात्र त्यांची उंची आणि देह पात्राशी सुसंगत असला पाहिजे, त्यांच्या योग्यतेवर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. पण नासिरुद्दिनच्या शरीरयष्टीशी जुळणारी भूमिका तुम्ही कुलभूषणला देऊ शकत नाही इतकंच.
स्मिता पाटील यांना तुम्ही चित्रपटात आणलं. त्यांचा अभिनय कसा होता?
स्मिता अशा प्रकारची अभिनेत्री होती जिच्यावर कॅमेऱ्यानेही प्रेम केलं. ती कॅमेऱ्यासमोर येताच तिच्यात चमत्कारिक बदल घडायचा. मला यातून हे म्हणायचंय की सामान्य आयुष्यात साधारण भासणारी स्मिता, कॅमेरा समोर येताच अक्षरशः चमकू लागायची. याशिवाय ती कोणतीही भूमिका करू शकते हे तिचे वैशिष्ट्य होते.आणि ती माणूस म्हणून खूप चांगली होती.
तुम्ही वंचित वर्गाला नेहमी तुमच्या चित्रपटांमध्ये स्थान दिलं आहे. ही तुमची विचारसरणी आहे की राजकारण?
हे निश्चितच माझे मत आहे. मला जे जाणवले ते मी पाहिले आहे. समाजाशी संबंधित समस्या मी दाखवल्या आहेत.
तुम्ही कधी मनमोहन देसाई किंवा यश चोप्रा बनण्याचा विचार केला आहे का? तुमच्या चित्रपटांमध्ये चकचकीत गाड्या, महागडा सेट, सुंदर नायक आणि नायिका असाव्यात असं तुम्हाला वाटत नाही का?
माझ्यात तशा प्रकारची संवेदनशीलता नाही. कदाचित मी असे चित्रपट करू शकणार नाही.
जुबैदामध्ये रेखासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
मला खूप छान वाटलं. खरं पाहता रेखाने त्याआधी 1980मध्ये माझ्यासोबत कलयुग मध्ये काम केलं होतं. ती खूप मेहनती अभिनेत्री आहे. खूप कमी लोकांना माहित असेल की ती सेटवर पूर्णपणे तयार होऊन येते, ती तुमचा वेळ वाया घालवत नाही. मला तिच्या फोटोग्राफिक स्मरणशक्तीचं कौतुक आहे. 30 वर्षांपूर्वीचे संवादही तिला लक्षात राहतात.
मला आठवतं की मी जेव्हा कलयुग बनवला तेव्हा शूटिंगच्या ठिकाणी खूप गोंगाट व्हायचा आणि पोस्ट सीन डबिंग करावं लागायचं. यात 32 सीन्स होते आणि ते डब करावे लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सीन पाहिल्यानंतर रेखाने अवघ्या दोन तासांत संपूर्ण डबिंग केलं.
आणि करिश्मा कपूरचा अभिनय कसा होता?
जुबैदामध्ये करिश्माचा अभिनय शानदार होता. तिने अतिशय जिवंत आणि संस्मरणीय भूमिका साकारली. ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला त्या प्रत्येकाला करिश्माची भूमिका उत्तम वाटली.
आजच्या काळात तुम्ही कोणत्या दिग्दर्शकाला सर्वात प्रतिभावान मानता?
कोणत्याही एका दिग्दर्शकाचं नाव घेता येणार नाही. सध्या अनेक चांगले दिग्दर्शक आहेत. अनुराग कश्यप आहे. 'चक दे इंडिया'चे शिमित अमीन, नीरज पांडे, नागेश कोकुनूर, 'मुंबई मेरी जान'चे निशिकांत कामत हे खूप चांगले दिग्दर्शक आहेत.
तुम्ही अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. तुमचा आवडता कलाकार कोण आहे?
अनेक आहेत. पण जर तुम्ही मला विचारले की, आमच्याकडे असलेले दोन सर्वोत्कृष्ट अभिनेते कोण आहेत, तर मला अमिताभ बच्चन आणि नसीरुद्दीन शाह या दोघांची नावं घ्यायला आवडेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.