आई-बहिणीवरुन शिवीगाळ करणाऱ्यांनो याद राखा, 'या' गावात वसूल केला जातो दंड
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Twitter,
"खूप चीड येती. अशा आई-बहिणीवरुन कुणी शिव्या दिल्या तर चीडच येती. त्याला कुठेतरी विरोध व्हायला पाहिजे होता. त्यावर आमच्या गावानं निर्णय घेतला. त्यामुळे मला अभिमान आहे आमच्या गावाचा."
सौंदाळा गावच्या मंगल चामुटे सांगत होत्या. गावात दुपारी आमची त्यांच्याशी भेट झाली.
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे 1800 लोकसंख्येचं गाव. हे गाव सध्या चर्चेत आहे. कारण, गावात आई-बहिणींवरुन शिवीगाळ करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय. यासाठीचा ठराव ग्रामपंचायतीनं पारित केलाय.
गावात प्रवेश करतानाच या ठरावाची माहिती देणारे मोठे बॅनर लावलेले दिसून येते. शेजारीच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात आमची भेट सरपंच शरद आरगडे यांच्याशी झाली.
ठरावाविषयी माहिती देताना ते म्हणाले, "या ठरावाची हेडलाईनच आम्ही माता-भगिनीचा सन्मान अशी केलीय. ज्या महिलेच्या उदरामध्ये 9 महिने राहून आपण जन्म घेतो, तो किती पवित्र देह आहे. त्या पवित्र देहाची विटंबना आपण करायची नाही, शिवीगाळ करताना आई-बहिणीवरुन आपण शिवीगाळ करतो, तर शिवीगाळ करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड ग्रामसभेनं करण्याचं ठरवलं."
महिला-तरुणांनी केलं निर्णयाचं स्वागत
गावात फिरताना सगळीकडे या ठरावाचे पोस्टर्स लागल्याचं दिसून येतं. गावातल्या एका चौकात ज्ञानेश्वर थोरात त्याच्या मित्रांसोबत चर्चा करत होता.
या ठरावाविषयी विचारल्यावर तो म्हणाला, "योग्य निर्णय आहे कारण कधी पण मित्र बसले, काही कारण नसताना आईला-बहिणीला मधी घ्यायचं, शिव्या द्यायच्या. हे चुकीचं आहे. कारण आपण मित्रा-मित्रांमध्ये भांडण करतो आणि घरच्यांना मधी घेतो हे योग्य नाही. जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे. कारण कमीतकमी जो दंड त्यांनी लावलाय त्या भीतीनं तरी कुणी शिवी देणार नाही."
सौंदाळा गावातल्या महिलांना हा निर्णय महत्त्वाचा वाटतो.
ग्रामस्थ ज्योती बोधक म्हणाल्या, "आमच्या सौंदाळा गावात जसं ग्रामपंचायतनं ठराव केला 500 रुपये दंड वसुली करायची. जेणेकरून लोक 500 रुपये दंड देतील, तेव्हा कमी कमी होत जाईल प्रमाण शिव्या देण्याचं."
दोघांकडून दंड वसूल
28 नोव्हेंबर 2024 रोजी हा ठराव घेण्यात आला आणि त्याला कृतीतही उतरवण्यात आलं. गावामध्ये शिवीगाळ करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला.
सरपंच शरद आरगडे म्हणाले, "शेतीच्या बांधावरुन दोघांमध्ये वाद झाले. त्याचे पडसाद घरीही झाले. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. प्रामाणिकपणे दोघांनी मान्य केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी बांधावर गेलो. त्यांचा वाद पोल (खांब) रोवून मिटवून देऊ असं ठरलं. आणि दोघांनी मान्य केलं की आम्ही एकमेकांना शिवीगाळ केली होती. त्यांनतर त्यांनी 500-500 रुपये दंड भरला."
पण, मग शिवीगाळ करुनही कुणी दंड भरण्यास नकार दिला तर काय ? तर यासाठीची तरतूदही ग्रामपंचायतीने करुन ठेवलीये.
"त्याच्यासाठी आम्ही असा विचार केली की, सगळ्यात पहिले ग्रामपंचायत दप्तरी त्याची नोंद घ्यायची. त्याच्यानंतर त्यांना नोटीस बजवायची. नोटीस बजावल्यानंतर जर त्यांनी भरले नाही, तर त्याचं काहीतरी काम गुतणार आहे आमच्याकडे. त्यावेळेस ते सक्तीने वसूल करणार. त्याच्याशिवाय त्याला त्याचे कोणतेही डाक्यूमेंट देणार नाही," आरगडे म्हणाले.
शिवीगाळ करणाऱ्यांवर सीसीटीव्ही नजर ठेवणार
बऱ्याचदा एखादी ग्रामसभा जेव्हा एखादा निर्णय घेते, तेव्हा गावातली बरीच माणसं शेतात किंवा कामानिमित्त बाहेर गेलेली असतात. त्यामुळे ते ग्रामसभेला उपस्थित राहू शकत नाही.
अशावेळी सौंदाळा ग्रामपंचायतीनं नुकतेच जे ठराव पारित केलेत, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी गावात ठिकठिकाणी असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्याद्वारे ठरावांबाबतची जनजागृती करण्यात आलीय.
हा नियम शिवीगाळ करणाऱ्या महिला व पुरुष दोघांनाही लागू असणार आहे. पण शिवीगाळ करणाऱ्यांवर वॉच कसा ठेवणार?
आरगडे म्हणाले, "गावात आम्ही सगळीकडे सीसीटीव्ही बसवलेले आहेत आणि सीसीटीव्हीला माईक आहेत. सार्वजनिक ठिकाणी माणूस ज्यावेळी शिव्या देतो तेव्हा तो आरडू-आरडू शिव्या देतो. तर त्याच्यावर एक व्हेरिफिकेशन होईल. दुसरी गोष्ट, वाद सुरू झाला की तो दोघांचाच असतो, पण तिथं दहा-बारा जण जमा होतात आणि मग बाकीचे पण सांगतात की यांनी यांनी शिव्या दिल्यात."
संध्याकाळी 7-9 मुलांना मोबाईल बंदी
पुढल्या पिढ्यांसाठी असे निर्णय गांभीर्याने राबवले पाहिजेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
सौंदाळा गावच्या ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे म्हणाल्या, "आपण मोठे व्यक्ती जेव्हा शिवीगाळ करतात किंवा अर्वाच्य भाषेत बोलतात, तर लहान मुल त्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे मग आपण यासाठी स्वत:पासून सुरुवात केली आणि हे थांबवण्याचा प्रयत्न केला, तर याला आळा बसण्यासाठी नक्कीच मदत होईल."
शिवीगाळ बंद करण्यासोबतच शाळकरी मुलांच्या संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत मोबाईल वापरावर बंदी करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतीने घेतलाय. पालक मंडळी यावर अंमलबजावणी करत आहेत.
मंगल चामुटे यांचा मुलगा गावतल्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "आम्ही मुलांना सांगतो की, आपल्या ग्रामपंचायतीनं काय निर्णय घेतला, 7 ते 9 मुलांना मोबाईल द्यायचा नाही. मग आमचे मुले स्वत:हून म्हणतात आम्हाला अभ्यासाला बसव, आमचे फोटो काढ, ग्रूपवर टाक. मग ते काय फक्त फोटोपुरतच म्हणत नाही. मग आम्ही त्यांनी 9 पर्यंत बसवतोच अभ्यासाला. असं नाही की फोटो काढला आणि झाले बाजूला."
मुलांचे अभ्यास करतानाचे फोटो गावातील व्हॉट्सअप ग्रूपवर आल्याचं सरपंचही दाखवतात.
दरम्यान, आपल्या आईचा किंवा बहिणीचा अपमान होऊ नये, यासाठी इतर गावांनीही शिवीगाळ बंदीबाबत पाऊल उचलावं, असं आवाहन सौंदाळा गावकरी करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)