कोल्हापुरात 'मृत्यूशय्येवरून उठलेल्या' आजोबांसोबत नेमकं काय घडलं?
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं, त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही झाली आणि अचानक त्या व्यक्तीच्या शरीराची हालचाल होत, ती व्यक्ती जिवंत असल्याचं कळलं तर...?
कुणालाही हादरवून सोडणारी ही घटना कोल्हापुरात घडलीय.
मात्र, या घटनेचं गांभीर्यही तितकंच मोठं आहे. यात चमत्काराचा दावा केला जातोय खरा, पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोपही होतोय.
ही संपूर्ण घटना काय आहे, हे आपण या बातमीतून जाणून घेऊ.
कोल्हापुरातील कसबा-बावडा इथले आजोबा मृत्यूशय्येवरून 'परतल्याची' घटना घडल्याचा दावा सर्वत्र केला जातोय.
या घटनेनंतर एकीकडे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जातंय, दुसरीकडे माध्यमांमध्येही ही बातमी प्रचंड व्हायरल झालीय.
मृत्यू झालेले आजोबा जिवंत झाल्याचा चमत्कार घडला, असंच सगळे म्हणत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र हा चमत्कार होता की वैद्यकीय निष्काळजीपणा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एखाद्या चित्रपटातील दृश्यं वाटावी, अशी ही घटना 65 वर्षीय पांडुरंग उलपे या आजोबांसोबत घडली. त्यांचं निधन झाल्याचं समजून कुटुंबीयांकडून अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली होती. सर्व नातेवाईकांनाही कळवण्यात आलं होतं.
पण रुग्णालयातून पांडुरंग उलपे यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जात असताना, वाटेत त्यांनी हालचाल केली आणि ते पाहून कुटुंबीय त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. त्यावेळी ते जिवंत असल्याचं समोर आलं.
रुग्णालयानं त्यांच्यावर उपचार केले आणि हे आजोबा आता पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
"डॉक्टरांनी आजोबांची प्राणज्योत मालवत आहे, नातेवाईकांना बोलवा आणि त्यांना घरी न्या," असं सांगितल्याचं पांडुरंग उलपे यांचे कुटुंबीय सांगत आहे. मात्र, रुग्णालयाचं किंवा डॉक्टरांचं नाव मात्र ते सांगायला तयार नाहीत.
तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणी हलगर्जीपणा झाला असून तक्रार आली, तर यावर कारवाई करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे.
पण पांडुरंग उलपे आजोबांसोबत नेमकं काय घडलं? या प्रकरणात निष्काळजीपणा झाला का? नेमकं काय घडलं होतं? हे आपण जाणून घेऊया.
डॉक्टर म्हणाले, 'प्राणज्योत मालवत आहे'
या प्रकरणासंदर्भात पांडुरंग उलपे यांचे नातू ओंकार रामाने यांनी बीबीसी मराठीला सर्व माहिती दिली.
पांडुरंग उलपे यांना 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी थोडं अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळं कुटुंबीय त्यांना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गंगावेश येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.
आजोबांना हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पांडुरंग उलपे यांची अवस्था नाजूक होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतरगी त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळं त्यांची एकुलती एक मुलगी आणि जावई यांना रुग्णालयात बोलवून घेतलं.
दरम्यान उपचार सुरू असताना पांडुरंग उलपे यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली, तसंच त्यांच्या हृदयाचे ठोकेही बंद झाले होते. अखेर पांडुरंग उलपे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे, असं सांगितल्याचं ओंकार म्हणाले.
डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यासही सांगितलं. त्यामुळं कुटुंबीय 17 तारखेच्या मध्यरात्री पांडुरंग उलपे यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात होते. त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बदं होती.
नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी देखील सुरू केली होती. सर्व नातेवाईकांना तसा निरोपही देण्यात आला होता.
स्पीडब्रेकरच्या धक्क्याने सगळंच बदललं
एकीकडं घरी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती, तर दुसरीकडं नातेवाईक त्यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात होते. पण त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देणारा प्रकार घडला.
उलपे यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका अचानक रस्त्यातील एका स्पीडब्रेकरवर आदळली. त्यामुळं पांडुरंग यांच्या निपचित पडलेल्या शरीराला जोरात धक्का बसला. त्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या बोटांची हालचाल झाल्याचं त्यांचे नातू ओंकार रामाने यांनी पाहिलं.
ओंकार यांनी सांगितलं की, आजोबांच्या बोटांची हालचाल झाल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोबत असलेल्या ऑक्सिमीटरनं त्यांच्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासून पाहिली. त्यानंतर आजोबा जीवंत असल्याचं लक्षात येताच त्यांनी लगेचच रुग्णवाहिका कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील हॉस्पिटलकडे वळवली.
या रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले आणि त्यामुळं 17 डिसेंबरला दुपारी 3 वाजता उलपे शुद्धीवर आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पूर्णपणे बरे होऊन, 30 डिसेंबरला ते घरी परतले. त्यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
ते घरी परतल्यानंतर त्यांचे व्हीडिओ आणि एकूणच ही संपूर्ण कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली.
पण त्यांनी आधी कोणत्या रुग्णालयात नेलं होतं आणि कोणत्या डॉक्टरांनी त्यांची 'प्राणज्योत मालवत चालली आहे' असं सांगितलं, याबाबत मात्र कुटुंबीय काहीही माहिती द्यायला तयार नाहीत.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी (सिव्हील सर्जन) मात्र यात हलगर्जीपणाचा प्रकार असल्याचं सांगितलं.
काय म्हणाल्या सिव्हिल सर्जन?
पांडुरंग उलपे यांचं हे प्रकरण समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं कोल्हापूराच्या सिव्हिल सर्जन डॉ. सुप्रिया देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, त्यांनी या प्रकरणी संबंधित पांडुरंग उलपेंच्या कुटुंबाकडून माहिती घेतली.
"पांडुरंग उलपे यांच्या इसीजीवर सरळ रेष आल्या आल्या संबंधित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं ओंकार रामाने यांनी आम्हांला लिहून दिलं आहे," असं डॉ. देशमुख म्हणाल्या.
मात्र, नियमानुसार असं लगेच कोणत्याही रुग्णाला मृत घोषित करत नसल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही रुग्णाला त्याचा मृत्यू झाल्याच्या एक तासानंतर मृत घोषित केलं जातं. तोपर्यंत त्या रुग्णावर वेगवेगळ्या पद्धतीनं आत्पकालिन औषधोपचार केला जातो, असंही त्यांनी सांगितलं.
"उलपे आजोबांच्या प्रकरणात असं काहीही केलं गेलं नाही. उलट त्यांना मृत घोषित करून ज्या रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात आणलं, त्याच रुग्णवाहिकेत टाकून परत नातेवाईकांसोबत पाठवण्यात आलं," असंही डॉ. देशमुख यांनी सांगितलं.
या प्रकरणात संबंधित डॉक्टरांकडून काही हलगर्जीपणा झाला असेल का? याबाबतही बीबीसीनं विचारणा केली. त्यावर डॉ. देशुमख यांनी स्पष्ट केलं की, "संबंधित डॉक्टरकडून दोन मुख्य चुका झाल्या.त्यांनी हृदय चालू दिसत नाही म्हणून लगेचच रूग्णाला मृत घोषित केलं ही पहिली चूक आणि रुग्णाचा मृत्यू झाला असेल असं समजलं, तरी पोस्टमॉर्टेम केल्याशिवाय त्याला घरी पाठवलं ही दुसरी चूक."
मृत्यू नक्की कशामुळे झाला हे कळण्यासाठी पोस्टमॉर्टेम गरजेचं असतं, असं सांगताना मृत्यू प्रमाणपत्र न देता केवळ हृदय चालू नाही, एवढंच सांगून पांडुरंग उलपे यांना परत घरी पाठवणं ही गंभीर चूक असल्याचं मत डॉ. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं.
आजोबा पुन्हा शुद्धीत कसे आले?
असं असेल तर पांडुरंग उलपे परत शुद्धीवर कसे आले, याबाबतही आम्ही डॉ. देशमुख यांना विचारणा केली.
त्यावर त्यांनी सांगितलं की, "कार्डियाक अरेस्ट आल्यानंतर हृदय अचानक बंद पडतं. अशा वेळी हृदय पुन्हा चालू करण्यासाठी आम्ही रुग्णाला कार्डियाक मसाज देतो किंवा त्याच्या हृदयात इंजेक्शन देतो."
रूग्णवाहिका स्पीड ब्रेकरवरून उडाल्याने पांडुरंग उलपे यांना धक्का बसला आणि त्या धक्क्यामुळं त्यांचं हृदय पुन्हा चालु झालं असावं, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान पांडुरंग उलपे यांना ज्या डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्याकडून तसेच संबंधित रूग्णालयाकडून या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कुटुंबीयांनी रुग्णालयाचं नाव सांगायलाही नकार दिला आहे.
घरातील ज्येष्ठ सदस्य मृत्यूशय्येवरून परत आल्यामुळं कुटुंबीयांसाठी ही चमत्काराची घटना आहे. पण जर स्पीडब्रेकरचा धक्का बसलाच नसता तर? असाही प्रश्न आहे. त्यामुळं 'त्या' डॉक्टरांचा हलगर्जीपणा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरणार होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)