Jump to content

ग्रीक संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
ग्रीक संस्कृती

ग्रीक संस्कृतीचा उदय इ.स.पूर्व १५००च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला. येथील लोक 'ग्रीक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहान-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.

राजकीय व्यवस्था

ग्रीक संस्कृती

डोंगराळ प्रदेश, शेकडो लहान लहान बेटे, मर्यादित शेतजमीन यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहामध्ये विभागला गेला होता. कालांतराने या समूहामधून नगरराज्ये उदयास आली. या नगराज्यामधून ग्रीक संस्कृती विकसीत झाली. सर्वसाधारणपणे या या नगरराज्यांमध्ये लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था होती. काही ठिकाणी राजसत्ता होती. मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते.

पुढे कालांतराने आपापंसातल्या युद्धामुळे ग्रीक नगरराज्ये दुर्बळ बनली. इ.स.पूर्व ३३८ मध्ये मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरांज्यावर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली.

सामाजिक जीवन

ग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्यछोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाजरचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवनपद्धती यांमध्ये बरेच साम्य होते, म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात.

ग्रीक समाजात दोन प्रमुख घटक होते. एक ग्रीक नागरिकांचा व दुसरा गुलाम, युद्धकैदी इत्यादींचा. राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील अधिकार फक्त ग्रीक नागरिकांनाच होते. गुलाम, युद्धकैदी त्यापासून वंचित होते. ग्रीक समाजव्यवस्था पित्रृसत्ताक होती. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. शिक्षण, संपत्ती व वारसा याबाबत स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार होते. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे राजकीय अधिकार नव्हते.

आर्थिक जीवन

भूमध्य सामुद्रिक हवामान व तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा ग्रीकांच्या आर्थिक जीवनावर महत्त्वपुर्ण परिणाम झाला. ग्रीसमध्ये फळफळावळ व लाकूड यांची उत्तम पैदास होत असे. फळांच्या बागा हे ग्रीकांच्या उत्पनाचे महत्त्वाचे साधन होते. ग्रीक लोक या फळांपासून उत्तम प्रकारचे मद्य बनवित. फळे, मद्य व ऑलिव्ह तेल हे त्यांच्या निर्यातीचे प्रमुख घटक होते. ग्रीसमध्ये चांगल्या प्रतीचे मुबलक लाकूड उपलब्ध होते. त्याचबरोबर विपूल सागरी किनारपट्टी लाभल्यामुळे जहाजबांधणीचा उद्योग येथे विकसीत झाला.

ग्रीसमधील डोंगराळ प्रदेश व मर्यादित शेतजमीन यामुळे तेथील लोक मेंढ्यापालनाचा व्यवसाय करत. कापूसापासून सूत कातने, कापड विणने व लोकरीचे कपडे तयार करणे इत्यादी कामे स्त्रिया करीत असत. निसर्गामध्ये संगमरवरी दगड निर्यात करणे हाही एक मोठा उद्योग होता.

कला व स्थापत्य

निसर्गाचे वास्तववादी चित्रण हे ग्रीक कलेचे वैशिष्ट्य होय. ग्रीकांनी बांधलेल्या मंदिरातून त्यांच्या कलात्मकतेची व भव्यतेची जाणीव होते. ग्रीक वास्तुतज्ज्ञांनी स्तंभाच्या विविध प्रकारांचा मोठ्या कुशलतेने व कलात्मकतेने वापर केला आहे.

ग्रीकांनी अनेक मनमोहक शिल्पे तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी संगमरवरी दगडाचा वापर केला. ग्रीक शिल्पांची वौश्ष्ट्ये पाहतांना त्यांची प्रमाणबद्धता यामधून दिसणारे शरीररचनेचे सूक्ष्म दर्शन व मानवी भाव-भावनांचा अविष्कार करण्याचे त्यांचे कौशल्या या बाबी दिसून येतात. ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या बऱ्यात अंशी ग्रीकांना महत्तवपूर्ण वाटणाऱ्या पुराणकथांवर आधारलेल्या आहेत.

धर्मकल्पना

झूस

झूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव होय. याबरोबर ग्रीक लोक हेरा, अपोलो, ॲथेना, व्हिनस, मर्क्युरी या देवतांची पूजा करत. ग्रीक संस्कृतीत प्रत्येक नगराची एक स्वतंत्र्य देवताही असे. प्रत्येक देवताला एक परंपरा असून त्याचा संबंध भौगोलिक परिस्थितीचा व समाजजीवनाशी होता. देवतांना पशुबळी दिला जात असे. धार्मिक विधीमध्ये प्रामुख्याने स्त्रिया पौरोहित्य करत. देवता आपल्या स्त्री पुरोहिताकडे प्रत्यक्ष संदेश देतात असे मानले जाई. स्त्री पुरोहिताने सांगितलेल्या या संदेशांना 'ऑरेकल्स'असे म्हणतात. डेल्फीच्या मंदिरातील ऑरेकल्स प्रसिद्ध आहेत. तसेच ग्रीकांचा मरणोत्तर जीवनावर व स्वर्ग-नरक या कल्पनांवरही विश्वास होता.

क्रीडा

क्रीडा क्षेत्रात ग्रीकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दर चार वर्षांनी सर्व ग्रीक नगरराज्यातील खेळाडू ऑलिम्पिया या ठिकाणी एकत्र येत. तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा होत. या सामन्यांसाठी आॅलिपिंया येथील वनश्रीयुक्त जागेची निवड करण्यात येऊन तेथे ग्रीकांचे मुख्य दैवत झूसचे भव्य मंदिर बांधण्यात आले. मंदिरात झूसचा १२.१९ मीटर उंचीचा सुवर्ण व हिरेमाणकांचा पुतळा उभारला. दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात झूसच्या उत्सवार्थ ऑलिम्पिक सामने भरवण्यात येत. सामन्यात धावने, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, कसरती इत्यादींचा समावेश असे. या आॅलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या काळात सर्व युद्धांना बंदी घालण्यात येई. आॅलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे सदभावना, मैत्री व शांतता यांचे प्रतीक मानले जाई. आजच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ प्राचीन ग्रीक कथेत आहे.