विजयदुर्ग

महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनारपट्टीवरचा जलदुर्ग

विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे.[]

विजयदुर्ग किल्ला

गुणक 16°33′39″N 73°20′00″E / 16.5607°N 73.3334°E / 16.5607; 73.3334
नाव विजयदुर्ग किल्ला
उंची 100
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण देवगड, महाराष्ट्र
जवळचे गाव विजयदुर्ग
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना ११९३


प्रवेशद्वार

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.

इतिहास

संपादन

विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५०मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन 'विजापूरकरांचा अभेद्य किल्ला' असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.[] कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने १३ फेब्रुवारी १७५६ रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज-पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर बाणकोट किल्ला व त्या जवळील सात गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग आठ महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. [] १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता.[] ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

नागरी सुविधा

संपादन

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

विजयदुर्गला पोहचायचे कसे:

संपादन

विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

संपादन
 
Inside view of the watchtower of vijaydurga

या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक १३ डिसेंबर, इ.स. १९१६ या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे.[]

विजयदुर्गाचे रहस्य

संपादन

एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्याअनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायाचा त्यांचा मनसुबा होता पण, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे ह्या भिंती वरून सहज ये-जा करत. कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहीला. सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधल्याच्या तथ्याला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्रफीतील तज्ञांनी दुजोरा दिला []

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ कदम, माधव (2006). सिंधुदुर्ग दर्शन: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन मार्गदर्शक. सोलाली प्रकाशन.
  2. ^ अक्कलकोट,२००९ पृ. ३५०.
  3. ^ अक्कलकोट,२००९ पृ. ३५०-३५१.
  4. ^ Ketakara, Dattātraya Rāmacandra (2001). Bhārata kī ajeya nausenā (हिंदी भाषेत). Prabhāta Prakāśana. ISBN 978-81-7315-357-0.
  5. ^ /https://www.bankofindia.co.in/
  6. ^ "सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्युमेन्ट्स" (इंग्रजी भाषेत). 2013-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ ऑगस्ट २०१३ रोजी पाहिले.
  7. ^ शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन - प्र. के. घाणेकर

संदर्भसूची

संपादन
  • अक्कलकोट, सतीश. दुर्ग.